नाशिक : सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहेत, ही लूट थांबली पाहिजे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले की, मंदिर, मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा, भक्तांची काळजी करा असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला.


शेट्टी म्हणाले की, गाईचा छळ केला असा माझ्यावर गुन्हा दाखल केलाय, आम्ही गाईचा छळ कसा करणार. दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन करतोय, मात्र त्याबाबत गुन्हा दाखल होतोय तो होऊ द्या आंदोलन सुरूच राहणार, असंही ते म्हणाले.  सरकार ज्यावेळी दूध खरेदी करते तेव्हा भाव मिळाले पाहिजे पण राज्यात दुधाचे भाव कमी होत आहेत. सुशांतसिंग आत्महत्याची चर्चा होते, मात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणी कोणीच चर्चा करत नाही हे दुर्दैव आहे, असंही शेट्टी म्हणाले.


शेट्टींविरोधात गुन्हे दाखल


दूध दरवाढीसाठी राजू शेट्टी सध्या राज्यभर आंदोलन करत आहेत.  दुधाच्या भुकटीच्या आयात बंदी व राज्य सरकारकडून दुध दर दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून 27 ऑगस्ट रोजी बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चा प्रकरणी पोलिसांनी शेट्टी यांच्यासह 60 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत जमाव करण्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मनाई आहे. तरीही शेट्टी यांनी मोर्चा काढल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबादमध्ये देखील शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.


बारामतीत काय म्हणाले होते शेट्टी


शेट्टी यांनी बारामतीत बोलताना म्हटलं होतं की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंगल्याबाहेर पडावं व महाराष्ट्रात काय चाललं आहे हे पाहावं. अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पद्धतीने चोरी करत आहेत, असाही गंभीर आरोप शेट्टी यांनी केला होता.  सर्वपक्षीय नेते कागदी मेळ बसवून सरकारी तिजोरी लूटत आहेत, असंही ते म्हणाले होते. शरद पवारांबद्दलचा स्नेह अजूनही आहेच, मात्र माझा शेतकऱ्यांचा स्नेह सुटणार नाही,ज्यावेळी शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे येईल त्यावेळेस मी रस्त्यावर आहेच, असं ते म्हणाले होते.  जोपर्यंत दुधाला दरवाढ मिळत नाही तोपर्यंत गावात येणाऱ्या मंत्र्यांना दुधाने अंघोळ घालावी असा इशारा त्यांनी दिला होता.