औरंगाबाद: कोपर्डीच्या नावाखाली जर अनुसुचित जातींच्या लोकांवर अन्याय होणार असेल, तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, तसेच आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत, असं खळबळजनक वक्तव्य सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केलं.ते काल औरंगाबादेत इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये बोलत होते.

बडोले यांनी सध्या आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चांवरही जोरदार हल्ला चढवला. ''कोणीही येतं आणि आरक्षणाची मागणी करतं. ज्याच्याकडं पैसे जास्त आहेत, त्यांची आंदोलनं यशस्वी होतात,'' असंही ते यावेळी म्हणाले.

बडोलेंच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीने समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बडोले मंत्रीपदाच्या शपथेचं उल्लंघन  करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, ''महाराष्ट्रामध्ये मुठभर लोकं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवातात. समाजिक सलोखा बिघडवण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे मंत्री शपथेचं उल्लंघन करत आहेत. गिरीश महाजनांच्या वक्तव्यामुळे नाशिकचं वातावरण बिघडवलं. तेव्हा सामाजिक सलोख बिघडवणं राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे,'' अशी मागणी मलिक यांनी केली.