मुंबई : आपल्याला मतं मिळतात, पण मतपेटीतून ती चोरली जातात. राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची जर चौकशी झाली तर गेल्या 10-12 वर्षातील यांचा खेळ समोर येईल असं म्हणत राज ठाकरेंनी मतचोरीच्या वादात उडी घेतली आहे. एकाच वेळी राहुल गांधी आणि भाजपचे अनुराग ठाकुर मतांच्या गोंधळाचा आरोप करत आहेत. पण निवडणूक आयोग हे प्रकरण दाबून ठेवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. निवडणूक जिंकायची असेल तर मतदारयादीतील घोळ उघडा पाडा असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना एक प्रकारे दुजोरा दिला. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली तर यांचा खेळ उघडा पडेल असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपवर टीका केली.
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे असं मी नेहमी म्हणतो. यासाठी मी शरद पवार, सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना भेटलो. महाराष्ट्रात सगळे माझ्यासोबत आले आणि आमची पत्रकार परिषदही झाली. पण आयत्या वेळी यांनी कच खाल्ली. मी त्याचवेळी सांगत होतो की, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका, त्याची जागतिक बातमी होईल. आता राहुल गांधी यांनी हे प्रकरण बाहेर काढलं.
मी तेव्हापासून सांगतोय, आपल्याला मत पडत नाहीत असं तुम्ही समजू नका. मतांमध्ये गडबड आहे. आपली मतं चोरली जातात. त्यामुळे तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतंय. या मतांची चोरी करत करत हे सगळे सत्तेवरती आहेत.
भाजपने 132, शिंदे 56 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 42 जागा जिंकल्या. एकूण 232 जागा आल्या. एवढं बहुमत मिळूनही महाराष्ट्रात एवढा सन्नाटा पसरला होता. कुठेही विजयाचा जल्लोष नव्हता. जे विजयी झालेत त्यांना पटत नव्हतं. जे पराभूत झालेत त्यांनाही पटत नव्हतं. कारण हा सगळा मतांचा गोंधळ होता. या मतांच्या गोंधळामुळे 2014 पासून सत्ता राबवली गेली.
नुकतीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. त्यांनी राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला सांगितलं. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्याचवेळी भाजपचे नेते अनुराग ठाकुर यांनीही सहा मतदारसंघांचा संदर्भ देत तसाच आरोप केला. आता एकाचवेळी सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीच्या गोंधळावर आरोप करतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई केली पाहिजे. पण हे सगळे प्रकरण दाबलं जात आहे. कारण गेल्या 10-12 वर्षांचा खेळ उघडा पडेल. हे सगळं उघडं पाडायचं असेल, जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला मतदार यादीवर काम करायला हवं. तोपर्यंत विजय हाताशी येणार नाही.
ही बातमी वाचा: