Raj Thackeray : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या धार्मिक ध्रुवीकरण आणि इतिहास उकरून माथी फडकवण्याच्या उद्योगाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुडीपाडव्याला शिवतीर्थावर सणसणीत चपराक दिली. मराठी म्हणून उभे राहा आणि पाहा यांचे पाय कसे लपटतात ते, अशा शब्दात मनसे अध्यक्षांनी महाराष्ट्र धर्म बुलंद करण्याचे आवाहन केले.
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबची कबर राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू झाला आहे. मात्र, राज यांनी लुंग्या सुंग्यांच्या वक्तव्यांना भीक न घालता त्यालाच इथंच गाडलाय हे कळू द्या, असे सांगत त्यांनी कबरीवरून सुरु असलेल्या वादावर त्यांनी चपराक दिली. कुंभमेळ्यात झालेल्या गंगेच्या प्रदुषणावरून त्यांनी लाव रे व्हिडिओ करत गंगेची गटारगंगा दाखवून दिली. मुंबईत कोळसा झालेली मिठी नदी सुद्धा त्यांनी व्हिडिओतून दाखवत नद्या वाचवण्याचे आवाहन केले.
त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ
राज ठाकरे म्हणाले की, तुम्ही मराठी म्हणून एक व्हा आणि बघा यांचे पाय कसे लटपटतील ते... आजच्या मराठी नववर्षाच्या निमित्ताने शपथ घ्या की आम्ही मराठी म्हणून एकत्र येऊ, आणि जो कोणी मराठी माणसाच्या किंवा मराठी भाषेच्या अंगावर येईल त्याला मराठी म्हणून अंगावर घेऊ. आणि जर कोणी हिंदूंच्या अंगावर आलं तर त्यांना हिंदू म्हणून अंगावर घ्या. त्यांनी पुढे सांगितले की, आज मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत त्याकडे लक्ष नाही. इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली? जात जातीला सांभाळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं, का नाही झाली कर्जमाफी ? अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही 30 तारखेच्या आत पैसे भरून टाका.
आत्ता कुठून आठवला औरंगजेब?
राज ठाकरे म्हणाले की, आपण अडकलोय औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे का राखली पाहिजे या चर्चेत. आत्ता कुठून आठवला औरंगजेब? चित्रपट पाहिल्यावर हिंदुत्व आठवलं? चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य आठवतं ? हल्ली कोणीही विधानसभेत इतिहासावर बोलतात. माहिती तरी आहे का हे औरंगजेब प्रकरण? औरंगजेबाचा जन्म गुजरातमधल्या दाहोदमधला. मग यावरून ब्राह्मण, मराठा आणि इतर जातीत भांडणं लावायची. यांना फक्त तुमची माथी भडकवायची आहेत. यांना छत्रपती संभाजी महाराजांशी घेणंदेणं नाही. या हिंद प्रांतात एक कडवट, प्रभावी स्वप्न ज्यांना पडलं त्या जिजाऊ साहेब. हे त्यांचं स्वप्न. त्यांना कळायचं नाही की आमचीच लोकं यांच्याकडे का चाकरी करत आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक चमत्कार आहे, तो एक विचार आहे.
मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला
ते पुढे म्हणाले की, औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला. मराठ्यांनी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते. शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे महाराजांनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला. माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात.
इतर महत्वाच्या बातम्या