Raj Thackeray on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी आता विधानसभेला काय भूमिका घेणार याची चर्चा रंगली होती. मात्र, आता विधानसभेला मनसेनं तुर्तास स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व जागांवर तयारी करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज ठाकरे यांनी दिला असला, तरी विधानसभेला मात्र वेगळा मार्ग निवडतात का? याकडे लक्ष आहे. 


लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही राग


दरम्यान, पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे म्हणाले की, झालेलं मतदान हे मराठी माणसाचं मतदान नाही. त्यांना वाटत असेल की, आपल्याला मतदान झालं आहे. मात्र, तसं झालेले नाही. उद्धव ठाकरेंना जे मतदान झालं आहे ते मोदी विरोधातील मतदान झालं आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही राग आहे. त्यामुळे जनता मनसेची वाट पाहत आहे. 200 ते 225 जागांवर आपण तयारी करत आहोत. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असेल,  यांच्यातच काही जागावाटप ठरत नाही. मी सुद्धा जागा मागायला जाणार नसल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


युती आघाडीबाबत लक्ष देऊ नका


पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या. तसेच मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी टीम सुद्धा तयार केला जाणार आहे. या टीम राज्यभर मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत. यामध्ये पक्ष संघटन वाढीसाठी सर्वांना अथक प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना कानमंत्री दिला.


यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, की युती आघाडीबाबत लक्ष देऊ नका. विधानसभेत जी भूमिका असेल ती मी योग्यवेळी तुमच्यासमोर मांडणार आहे. पक्ष सरचिटणीस आणि नेते पदाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जाणार आहे ती त्यांनी लवकरात लवकर देणं क्रमप्राप्त असणार आहे. दरम्यान मतदारसंघ आढावा घेण्यासाठी कोण टीम असतील हे तुम्हाला सांगितलं जाईल. ते त्यांचं काम करतील आणि रिपोर्ट देतील असेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या