मुंबई: 'संजय राऊत किती बोलतात, काय बोलतात, सगळ्याची एक अॅक्शन असते. चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय' अशी संजय राऊतांची खिल्ली मनसे प्रमुख राज ठाकरे उडवली आहे. मनसे आज आपला 16 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यावेळी ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पु्ण्यामध्ये वर्धापनदिन साजरा करत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे."


राज ठाकरे पुढे म्हणाले की, "सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."


राज्यपालांवर टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, "हे महाराष्ट्राचे राज्यपाल, यांना काही समज आहे का? असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल काही अभ्यास नसताना त्यावर भाष्य काय करायचं आणि समाजात भांडणं लावायची हे त्यांचे उद्योग."


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha