मुंबई: हे महाराष्ट्राचे राज्यपाल, यांना काही समज आहे का? असा सवाल करत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल काही अभ्यास नसताना त्यावर भाष्य काय करायचं आणि समाजात भांडणं लावायची हे त्यांचे उद्योग असं ते म्हणाले. मनसे आज आपला 16 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यावेळी ते बोलत होते. मनसे पहिल्यांदाच मुंबईबाहेर म्हणजे पु्ण्यामध्ये वर्धापनदिन साजरा करत आहे.
राज ठाकरे म्हणाले की, "रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल कधीच सांगितलं नाही की ते त्यांचे शिष्य होते, आणि शिवाजी महाराजांनीही कुठेही नमूद केलं नाही की रामदास स्वामी त्यांचे गुरू होते. मग काहीही बोलून नुसता भांडणं लावण्याचा उद्योग यांनी कशाला करायचा? आमच्या महापुरुषांना बदनाम करायचं आणि त्यांच्या नावावर मतं मागायची असा उद्योग सुरू आहे."
महात्मा फुले यांच्याबद्दलही राज्यपालांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरही राज ठाकरेंनी टीका केली आहे.
'इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूनो आणि भगिनींनो' असं आपल्या भाषणाची सुरुवात करत राज ठाकरेंनी आपल्या आगामी निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट केल्याचं सांगितलं जातंय.
संजय राऊतांवर टीका
गेल्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत भाजपवर टीका करण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "चॅनेल लागलं तर हे सुरू, चॅनेल हटलं तर हे बंद. मग नंतर यांचं पुन्हा कसं काय सुरू, काय चाललंय. भविष्यातील महाराष्ट्रातील पिढ्या या पाहतायत, ते काय शिकतील? यांना फक्त निवडणुकीचं पडलं आहे."
राज ठाकरे पुढे म्हणाले की, "सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले आहेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत. टीव्हीवर शिव्या सुरू आहेत, हेच राजकारण वरती असेल तर ग्रामपंचायतीमध्ये काय सुरू असेल. महाराष्ट्रातील लोक यांना वैतागले आहेत. त्यामुळे त्यांना काही अडचणी आल्या तर ते सरकारकडे न जाता आपल्याकडे येतात हे आपलं यश आहे. या 16 वर्षात लोक आपल्याकडे विश्वासाने येतात, ही 16 वर्षे आपली कमाई आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जे काम केलं त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत."
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha