मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. राज्यातही पावसाने हजेरी लावली आहे. ठाणे, पालघरसह मराठवाड्याच्या काही भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.


जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात पावसामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. जोरदार पावसाने केळना नदीला पूर आला आहे. आलापूर येथे केळना नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने सहा गावांचा संपर्क तुटला आहे. आलापूर, उस्मानपेठ, गेकुळवाडी, भिवपूर, प्रल्हादपूर गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलावर पाणी साचल्याने वाहतूक पूर्ण पणे बंद झाली.

औरंगाबाद रोडवरही जोरदार पावसाने पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. जालना-औरंगाबाद रोडवर नागेवाडी टोल नाक्यावरच्या उतारावर पाण्याचा ओढा तयार झाला. त्यामुळे औरंगाबादवरुन जालन्याच्या दिशेने येणारी आणि जालन्यावरुन औरंगाबादच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड आणि सिल्लोड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. मात्र इतर तालुक्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे. हतनूर शिवारात शिवना नदीला पूर आला आहे. निमडोंगरी, हतनूर, शिवराई, घुसूर शिवारात मुसळधार पाऊस झाल्याने तासाभरात नदी नाल्यांना पूर आला आहे. तसंच शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

बुलडाणा जिल्ह्यात भेंडवळमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसंच तीन महिला जखमी झाल्या आहेत. महिला शेतात काम करत असताना ही घटना घडली आहे. सर्व जखमी महिलांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच पावसाने समाधानकारक हजेरी लावली. आज झालेल्या मुसळधार पावसाने काही भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

पालघर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतूक त्याचप्रमाणे जनजीवनावरही परिणाम केला. काल सकाळपासून पावसामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. सफाळे, केळवे, मनोर, पालघर, बोईसर, चिंचणी, डहाणूमध्ये बाजारपेठेतील दुकान आणि काही घरांमध्ये ही पाणी शिरलं.

दुसरीकडे जव्हार, मोखाडा भागात मोठी पाणी टंचाई होती ती या पावसामुळे दूर झाली. सूर्या आणि वैतरणा नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. वसई, विरार महापालिकेला पाणी पुरवठा होत असलेले मासवन आणि धुकटण येथील पंपिंग स्टेशनमध्ये गढूळ पाणी शिरल्याने बिघाड झाला, त्यामुळे तेथील नागरिकांना अजून दोन दिवस पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

नांदेड जिल्ह्यात तीर्थक्षेत्र माहुरमध्ये पावसाने जोरदार एन्ट्री दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पहिलाच मोठा पाऊस झाला आहे. पावसाच्या आगमनाने माहूर तालुका सुखावला असला तरी जिल्ह्यात अन्यत्र कुठेही पाऊस पडलेला नाही.

हिंगोलीमध्येही शहरासह इतर भागात मेघगर्जनेसह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली आहे.