नाशिक : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून पुणे, नाशिकसह मराठावाडा आणि विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने शहराला झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं. शहरातील रस्त्यांना आले नद्यांचे रूप आल्याचं दिसून आलं. यावेळी, रस्त्यावरुन पाणी वाहत होतं, त्यातूनच नागरिकांना मार्ग काढवा लागला. तसेच, शहरातील उड्डाणपूल आणि पुलाखाली जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी साचलं होतं. त्यामुळे, नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिकसह पुणे शहरातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून हडपसर भागात पावसामुळे पाणीच पाणी झाल्याची परिस्थती निर्माण झाली. विशेष म्हणजे कालही पुण्यात पावसाची मुसळधार सरी कोसळल्या होत्या. 


नाशिकमध्ये (Nashik) दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली, केवळ अर्ध्या तास कोसळलेल्या मुसळधारांनी जनजीवन विस्कळीत झालं. दुसरीकडे पुणे (Pune) शहरातही पावसाचे दमदार आगमन झालं असून हडपसर भागात पाणीच पाणी साचलं होतं.  तसेच, वाशिम जिल्ह्यात आज अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे जोरदार अनेक गर्जना आणि विजेच्या कडकडाटात अर्ध्या तासापासून  पावसाची धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळाली. या पावसामुळे धरणक्षेत्र परिसरातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. अकोला जिल्ह्यातही गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारी दुपारी हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट सुरू असतानाच मुसळधार (Rain) पावसाने झोडपून काढले.


तळकोकणात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम


सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी भागात पावसाचा जोर कायम आहे. जिल्हात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. गेले आठ ते दहा दिवस विश्रांती घेतलेल्या  पावसाने कमबॅक केल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत. पावसाने उघडीप घेतल्यामुळे भात शेतीवर करपा रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढला होता.


यवतमाळमध्येही पाऊस


जिल्ह्यातही मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात उखाडा जाणवत होता. अशातच विजांच्या गडगडाटासह आज मुसळधार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संततधार पावसाने 15 दिवस हजेरी लावली होती. त्यामुळे, काही पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर उघाड मिळताच शेतकरी निंदन, डवरणी, फवारणीचा कामाला लागला होता. शेतकऱ्यांची ही कामे आटोपताच पुन्हा आज पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने पिकांना हा पाऊस लाभदायक ठरत असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.


दुचाकी गेली वाहून


यवतमाळच्या दारव्हा यवतमाळ महामार्गावर बोरीअरब येथील अडान नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने दुचाकी वाहून गेल्याची घटना आज घडली.  पुलावरून पाणी असताना कुणीही जाऊ नये, असे आदेश असतानाही काही नागरिक दुचाकी हातात पकडून जात असताना पाण्याचा प्रवाहात दुचाकी वाहून गेली. सुदैवाने यात कुठलीच जीवितहानी झाली नाही.


नांदेडमध्ये बैलजोडी गेली वाहून


नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील अप्पाराव पेठ येथील नाल्याला पावसाच्या पाण्यामुळे अचानक पूर आल्याने एक वयोवृद्ध व्यक्ती पाण्याच्या पुरात अडकला होता. या वयोवृद्ध इसमास आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने वाचविण्यास यश आले. तर, याच पुरात एक बैल जोडी वाहून गेली, दुर्दैवाने एक बैल मृत अवस्थेत आढळून आला. तर, अद्याप दुसऱ्या बैलाचा शोध घेण्यात येत आहे.