उरण : उरण ते जेएनपीटी मार्गावर असलेल्या फुंडे गावाजवळ असलेल्या खाडीवरील साकव (छोटा पूल) कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, अचानक कोसळलेल्या या साकवामुळे जखमी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गेल्या सुमारे 30 वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी उरण तालुक्यातील फुंडे गावाजवळ असलेल्या खाडीवर साकव उभारण्यात आले होते. फुंडे गावाजवळ असलेल्या खाडीमध्ये भराव करून चौपदरी रस्त्याचा भराव करण्यात आला होता. यावेळी, या खाडीवरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहासाठी साकव उभारण्यात आले होते. यामुळे, उरण शहरापासून जेएनपीटी बंदरात जाणाऱ्या कामगारांसाठी बसेसची वाहतूक ही या मार्गावर दररोज सुरू असते.
दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास फुंडे गावानजीक असलेल्या साकवाचा सुमारे 30 फूट लांब आणि 80 फूट रुंदीचा भाग हा अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. यावेळी, याच घटनास्थळाजवळ असलेल्या प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी मोठा आवाज झाल्याने धाव घेतली असता पाण्याचा मोठा फवारा उडाल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. तर, अचानक कोसळलेल्या या साकवामुळे या मार्गावरून प्रवास करणारा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे. यावेळी, स्थानिक गावकऱ्यांनी जखमी मोटारसायकलस्वार दिपक कासुकर याला बाहेर काढून जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला नवी मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला आहे.
त्यातच, फुंडे गावानजीक उभारण्यात आलेला हा साकव सुमारे 15 फूट खाली कोसळला असून या साकवाच्या बांधकामाची जोडणी ही निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तर, याच ठिकाणी असलेल्या साकवाचा दुसरा भाग ही धोकादायक असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
तर, उरण ते जेएनपीटी मार्गावर असलेला हा साकव कोसळल्याने फुंडे , डोंगरी आणि पाणजे गावांकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून बोकडविरा मार्गे ही वाहतूक वळविण्यात आली आहे.