Raigad : गेली 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग येत्या एप्रिल अखेरीस पूर्ण होईल असा आश्वासन देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनी संसदेत सर्वांना दिले आहे. त्यानंतर राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा रखडलेला हा  महामार्ग सुस्थितीत यावा यासाठी कोकणची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामार्ग संदर्भात पुन्हा एकदा नितीन गडकरी यांना निवेदन देत पूर्ण होण्यासाठी साकडे घातले आहे.

मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रमुख 4 केलेल्या मागण्या

1) कोलाड येथे सुरक्षित अंडरपासची उभारणी

2) महाड शहरासाठी सेवा रस्ता – गांधारपाळे ते साहिलनगर

महाड शहरातील स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वेगवान वाहनांमध्ये सध्या कोणतीही स्पष्ट विभागणी नाही.परिणामी अपघातांचा धोका वाढला आहे. यावर उपाय म्हणून गांधारपाळे ते साहिलनगर या दरम्यान स्वतंत्र सेवा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव.

3) मुंबई गोवा महामार्गावरील वीर गाव व टोल नाका परिसरात सर्व्हिस रोड

4) माणगाव तालुक्यातील गावांसाठी सलग सेवा रस्ता बनवून मिळणे 

माणगाव तालुक्यातील पहेल, खांडपाळे, लाखपाळे ते वडपाळे या गावांच्या हद्दीत सलग सेवा रस्ता नसल्याने स्थानिक नागरिकांना महामार्गावर उतरावे लागत आहे हा धोका लक्षात घेऊन या संपूर्ण पट्ट्यात सलग सेवा रस्ता विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 17 वर्षांपासून रखडला

गेल्या 17 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प अखेर निर्णायक टप्प्यात आला आहे. गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत महत्त्वाची माहिती देत या महामार्गाला नवी डेडलाईन जाहीर केली. आता कोकणातून मुंबईकडे जाणे पूर्वीपेक्षा अधिक जलद आणि सोपे होणार आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी या महामार्गाच्या पूर्णत्वाबद्दल स्पष्ट माहिती दिली. 2009 मध्ये सुरू झालेल्या या महामार्गाचा 89 टक्के भाग पूर्ण झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. उर्वरित काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अर्विंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती त्यांनी दिली. मुंबई-गोवा महामार्ग कोकणातून जात असून, रस्ते, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचा समावेश करून बांधण्यात आला आहे. पनवेल, रत्नागिरी, गोवा यांसह अनेक ग्रामीण भागांनाही हा महामार्ग जोडणार आहे. हा चार पदरी महामार्ग असून पूर्वी 2025ची डेडलाईन देण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे कामात विलंब झाला. आता मात्र प्रकल्प अंतिम टप्प्यात असून 2026 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.