Kirit Somaiya: रायगड (Raigad) जिल्ह्याच्या कर्जत (Karjat) तालुक्यातील वैजनाथ देवस्थानाची (Vaijnath Devasthan) जागा बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी आज (28 जानेवारी) आंदोलन केलं. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केलं. त्यानंतर कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन वैजनाथ देवस्थानची जागा परत करून जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. ही जागा आधी एका मुस्लिम नागरिकांच्या आणि त्यानंतर थेट शिवसेना नेत्याच्या एका नातेवाईकाच्या नावावर झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. 


किरीट सोमय्या हे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की "नवाब मलिक यांना मी मनोरंजनकार वाटतो मनोरंजन काय असतं हे मी त्यांना लवकरच दाखवून देणार आहे. नवाब मालिकांनी अनिल देशमुखांना विचारावं मनोरंजन काय असतं? भावना गवळी यांना विचारावं, आनंद अडसूळ जे हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना विचारावं की मनोरंजन काय असतं? याशिवाय त्यांनी स्वतःच्या जावयाला विचारावं आणि नाहीच कळालं तर त्यांना मनोरंजन काय असतं हे देखील लवकरच मी दाखवून देणार आहे. दरम्यान अजित पवार यांना टार्गेट करत जय पवारचे नाव घेत तिवरा एग्रो इस्टेट जय अजित पवार आणि एमआयडीसी यांच्यात जे आर्थिक व्यवहार झालेत ते अजित पवारांनी समोर ठेवावं", असं सोमय्या यावेळी म्हणाले.


भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली आहे. कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात आरोपांची मालिकाच सुरू केली होती. या पक्षांच्या काही नेत्यांविरोधात ईडीने कारवाईदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे भाजपकडून होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीकडूनही जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीकडूनही मलिक यांनी भाजप नेत्यांवर अनेक आरोप केले होते. अंमली पदार्थ सेवन प्रकरणात मलिक यांनी भाजप नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha