Raigad : रायगडच्या (Raigad) रोहा तालुक्यातील तांबडी गावातील एका पीडित मुलीवर 26 जुलै 2020 रोजी अत्याचार करुन तिचा जंगलात खून करण्यात आला होता. या घटनेचा निकाल तीन दिवसांपूर्वी माणगाव मधील कोर्टात लागला आहे. हा निकाल आरोपींच्या बाजूने लागल्याने सर्वांनाच याचा धक्का बसला आहे. या प्रकरणातील मोकाट फिरत असलेल्या 6 आरोपींना दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत माणगाव कोर्टाने दोषामुक्त केलं आहे. त्यानंतर रोहा शहरासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी योग्य तपास न केल्याने आरोपी सुटले, गावकऱ्यांचा आरोप
पोलिसांनी योग्य तपास न केल्याने आरोपी सुटले, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यात आले, असा संशय व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे पीडितेच्या कुटुंबावर अन्याय झाला आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. रोहा पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट इतकी कमकुवत होती की, ती न्यायालयात टिकलीच नाही. पुराव्यांची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब आणि डीएनए चाचण्या यात गंभीर त्रुटी आढळल्या. पोलिसांनी सात आदिवासी तरुणांना ताब्यात घेतले, पण ठोस पुरावे गोळा करण्यात पूर्णपणे अपयश आले. सकल मराठा समाज आणि गावकऱ्यांनी असा आरोप केला आहे
सकल मराठा समाजाकडून आक्रोश मोर्चा, आरोपींना फाशी देण्याची मागणी
विशेष म्हणजे सरकारी वकील ॲड. उज्वल निकम ही केस लढवत असताना त्यांना सुद्धा पीडित मुलीला योग्य न्याय न देता आल्यामुळे आज रोहा शहरात पीडित मुलीच्या कुटुंबासह तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून या घटने संदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा घोषणा देत महिलांनी संताप व्यक्त केला आहे. या जनआक्रोश मोर्चात असंख्य नागरिक सहभागी झाले होते. महिलांनी देखील संतापाची भावना व्यक्त करत या प्रकरणात पीडित मुलीला योग्य न्याय मिळावा अशी सरकारकडे मागणी केली आहे.
पीडीत कुटुंबाला न्याय देण्याकरिता उच्च न्यायालयात अपील दाखल करणार : अदिती तटकरे
सरकारी वकील उज्वल निकम ही केस लढवत होते. मात्र मुलीच्या बलात्कार झालेल्या मुलीच्या विरोधात लागलेल्या या निकालावर सर्वांनाच धक्का बसला आहे. यानंतर तत्कालीन पालकमंत्री आणि आताच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सुध्दा या निकालावर आज भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी ही प्रकरण न्यायालयीन असल्याने आम्हाला यावर काही जास्त भाष्य करणे किंवा बोलणं बंधनकारक आहे. परंतू, आम्ही सदर कुटुंबाला न्याय देण्याकरिता उच्च न्यायालयात लवकरात लवकर अपील दाखल करणार आहोत. शिवाय पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्याकरता आम्ही सर्वच कटिबद्ध असून मी या कुटुंबासोबत आहे. कोणी काय बोलतं हे दुर्दैव आहे. आम्ही सदर कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असू म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.
महत्वाच्या बातम्या: