मुंबई: राज्यातील 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर सोमवारी विधानसभेच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पदावर पुन्हा एकदा भाजपच्या राहुल नार्वेकर यांची वर्णी लागणार आहे. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या वादात राहुल नार्वेकर यांनी निर्णायक भूमिका बजावली होती. त्यामुळे आता राहुल नार्वेकर  हेच विधानसभा अध्यक्ष होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राहुल नार्वेकर हे रविवारी दुपारी 12च्या सुमारास विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला अर्ज दाखल करतील. यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ असल्याने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरची निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे.


पक्ष ठरवेल त्याप्रमाणे निर्णय घेणार


राहुल नार्वेकर याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मला पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल ती जबाबदारी मी पार पाडेन. पक्षाकडून विधानसभा अध्यक्षपदा संदर्भात जो निर्णय  घेतला जाईल तो मला मान्य असेल. मला पक्षाने अनेक संधी दिली आहे आणि यापुढेही जी संधी दिली जाईल त्यानुसार काम करेन. उद्या विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. मात्र पक्षाच्या निर्णयानुसार कोणाला अर्ज भरायला सांगितलं जाईल त्याला अर्ज भरावं लागेल.  


तत्पुर्वी शनिवारपासून विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.


शपथविधीच्या पहिल्याची दिवशी विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. मविआच्या आमदारांनी आज आमदारकीची शपथ घेण्यास नकार देत सभात्याग गेला. त्यामुळे आज केवळ सत्ताधारी आमदारांचा शपथविधी पार पडला. आतापर्यंत जवळपास 160 आमदारांचा शपथविधी संपन्न झाला आहे. तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आता महाविकास आघाडीचे आमदारही शपथ घेणार आहेत. मविआच्या आमदारांचा शपथविधी रविवारी पार पडेल.


ही बातमी वाचा: