नांदेड: काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज मराठवाड्यात येत आहेत. मात्र काँग्रेसचे महत्वाचे नेते नारायण राणे मात्र राहुल गांधींच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचं कळतंय. अर्थात गेल्या अनेक दिवसांपासून राणेंची भाजपशी जवळीक वाढली आहे.  मात्र खुद्द पक्षाचे उपाध्यक्ष राज्यात असतानाही राणेंची गैरहजेरी चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आल्याने, राणे हे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं जातंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर राणेंचा एकछत्री अंमल असल्यानं अनेक कार्यकर्तेही राहुल गांधींच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. शिवाय जिल्ह्यातल्या बैठकीत भाजप प्रवेशाच्या धर्तीवर राणे काय भूमिका घेतात, हे देखील महत्वाचं असणार आहे.