मुंबई : महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण चांगलंच तापलं असताना यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. राहुल गांधींनी 8 ऑगस्ट रोजी महत्वाची बैठक बोलावली आहे.

राहुल गांधींनी बोलावलेल्या या बैठकीला राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणावरुन सरकारविरोधात विरोधकांनी दंड थोपटले आहेत. तसंच सत्ताधारी भाजप-शिवसेनेनंही मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आरक्षणाची बाब कोर्टाच्या अधीन असल्याचं म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात राजघराणी रस्त्यावर

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरात विविध राज घराण्यातील मंडळी आज रस्त्यावर उतरली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या सरदार आणि जहागीरदार घराण्यांनी हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं, त्याच घराण्यातील लोक रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळालं.

महाराणी ताराबाईंच्या पुतळ्याजवळ भगवा ध्वज फडकावून शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर दसरा चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठिंबाही दिला. या आंदोलनात घोरपडे, चव्हाण, गायकवाड, शिंदे, खानविलकर यांच्यासह विविध राजघराण्यांतील मंडळीनी सहभाग नोंदवला.

सर्वांची संमती, मग मराठा आरक्षण अडलंय कुठं?: उदयनराजे

मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही तर मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही? 58 मूक मोर्चे निघाले पण तरीही मराठा आरक्षण लांबवलं. त्याचवेळी तातडीने पावलं उचलली असती, तर आज अनेकांचे जीव गेले नसते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असं उदयनराजे म्हणाले.