Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: तरुणांना रोजगार नाही, देशातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. युवकांचे भविष्य, रोजगार हिसकावून घेतले जात आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. ते नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
कन्याकुमारीहून भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. दोन महिन्यांपासून आम्ही दिवसभरात 25 किमी चालतो. मी एकटाच नाही तर माझ्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते आणि सर्वसामन्य नागरिकही देशाचा आवाज बनून चालत आहेत. या यात्रेत शेतकरी, महिला, विद्यार्थी, व्यापारी यांच्या समस्या एकूण घेतो. देशाचा शेतकरी, मजूर रस्त्यावर चालतो. त्यामुळे त्यांच्या समस्या हेलिकॉप्टर, विमानातून समजणार नाही. त्यामुळे देशाची आणि राज्याची अवस्था रस्त्याने समजते, पण प्रसारमाध्यमांकडून आमची दखल घेतली जात नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
विद्यार्थी, शेतकरी, छोटे व्यापारी यांच्या समस्या ऐकून दुःख होतेय. नोटाबंदीचा प्रभाव सहा वर्षानंतर त्सुनामीसारखा आजही दिसत आहे. काळ्या धना विषयी अद्याप काहीही झाले नाही. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. एअर बस प्रोजेक्ट गेला. मोबाईल फोनचा प्रोजेक्ट गेलाय, असा टोला राहुल गांधींनी लगावला.
आपल्या युवकांचे भविष्य, त्यांचे रोजगार हिसकावून घेतले जात आहेत. आज मी एका युवकाला भेटलो जो बस घेऊन आला होता. ज्याने माझ्याशी बातचीत केलीय. त्याला जे शिक्षणाविषयी माहिती आहे, ते एखाद्या शिक्षण तज्ञाला माहीत नाही. युवकांना काय करायचे विचारले तर IAS, डॉक्टर, आर्मी, वकील, पोलीस आणि शेतकरी शेवटी बनू इच्छितात. ते शेती करू इच्छित नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले.
युवकांना जर एखाद्या कंपनीत काम करायचे तर त्यास शाळेत याची माहिती मिळत नाही. दरम्यान मी येताना या रस्त्यावर मला एक चिमुकली भेटली. तिला मला भेटायचं होतं, तिला डॉक्टर बनायचे आहे. दरम्यान तिने संगितले की माझे आई-वडील माझ्या पेक्षा माझ्या भावांना प्रेम करतात. त्यामुळे हे ऐकून दुःख झाले. दरम्यान ज्या देशात महिलांचा आदर करत नाही, तो देश प्रगती करू शकत नाहीत. देशातील मीडिया, पत्रकार विरोधी पक्षाचे दाखवत नाहीत. देशातील लोकांच्या हृदयात भीती घालण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांना काय दर मिळेल, हे त्यांनाही माहीत नाही. देशातील शेतकरी जुगार खेळण्यासारखे पीक घेतो. देशातील सर्व धन ,प्रोजेक्ट नरेंद्र मोदींच्या मित्रांना जात आहेत. ज्यांनी देशातील एकही क्षेत्र सोडले नाही, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला.
नरेंद्र मोदींनी एक चूक केलीय. ती चूक नसून ती एक नीती होती. ज्यात छोट्या व्यावसायिकांना संपवायचे होते. दरम्यान कोविड मध्येही हेच झालेय. दरम्यान या छोट्या व्यापाऱ्यांना मारूनच मोठ्या व्यावसायिकांना उद्योग दिले जातील. दरम्यान जो माझ्याशी बोलेल तो बेरोजगार होईल. त्यामुळे व्यापारी रोजगार देणार नाही. सरकारी संस्था युवकांना रोजगार देतील. सगळीकडे खाजगीकरण चालू आहे.पेट्रोल, डिझेल,सिलेडर यांचे दर गगनाला भिडले आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.