अहमदनगर : शिर्डी साई संस्थानच्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नी अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेऊन ते बसत असलेल्या नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरणार असल्याचा इशारा माजीमंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी दिला आहे. आज कामगारांच्या बैठकीत विखे यांनी इशारा दिला असून यासह न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च पासून साई मंदिर बंद ठेवण्यात आले असून मंदिरात येणाऱ्या दानाला मोठा फटका बसल्याने अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली. यातील अनेक कर्मचारी कोरोनाच्या संकटात नर्सिंग स्टाफमध्ये कार्यरत असताना त्यांच्याही पगारात कपात करण्यात आलीय. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आज भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामगारांची बैठक घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उच्च न्यायालयाने संस्थानचा अंतरिम कारभार पाहण्यासाठी तदर्थ समितीची नियुक्ती केली आहे. समितीचे अध्यक्ष इथे न्यायाधीश नाहीत तर संस्थानचे अध्यक्ष आहेत. त्यांना कामगार व लोकप्रतिनिधींनाही भेटण्यास वेळ नसेल तर त्यांनी पदावरून दूर व्हावे अशी मागणी विखे यांनी करताना समितीच्या मनमानी काराभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी संस्थान कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. गुरूवारी ग्रामस्थ घंटानाद व महाआरती करतील. यानंतरही समितीच्या धोरणात फरक पडला नाही तर आपण कामगारांच्या बरोबर लाक्षणिक उपोषणाला बसणार असल्याचेही विखे यांनी जाहीर केले आहे.
या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. राज्यात 'सरकार' नावाची व्यवस्था कुठे आहे. केवळ इव्हेंट मॅनेजमेंट सुरू असल्याचा घणाघाती आरोप विखे पाटील यांनी केलाय. सरकार काय करत आहे, हे त्यांनी माहीत नाही आहे. केवळ मोठमोठे दावे केले जात आहेत. कोरोनासाठी मोठे हॉस्पिटल उभारल्याचे केवळ दावे उद्धव ठाकरे सरकारनं केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. प्रत्येक मंत्री संस्थानिक आहे मात्र जनतेसाठी काहीही करण्याची त्यांची भूमिकाच नाही, अशा शब्दांत विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्य मंत्री प्राजक्त तनपुरेंसह राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Kolhapur Coronavirus | कोल्हापूरच्या रुग्णालयात 17 व्हेंटिलेटर बंद अवस्थेत