Vijay Wadettiwar : ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पोहोचले. यावेळी वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट व्यासपीठावरून फोन करत या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्याच (21 जून) त्या ठिकाणी शिष्टमंडळ पाठवत असल्याचे सांगितले. ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी ओबीसीच्या लढ्याच्या पुस्तकात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं नाव लिहिले जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सरकारने भावनांची कदर करावी, असेही त्यांनी उपोषणस्थळी बोलताना सांगितले. 


दरम्यान, वडेट्टीवार यांनी फोनवरून मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी मंत्र्यांना पाठवा, या हजार लोकांच्या भावना असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलत असताना वडेट्टीवार यांनी फोन थेट स्पीकरवर लावत मुख्यमंत्री काय बोलत आहेत याची माहिती उपस्थितांना दिली. 


ओबीसींच्या मागे उभे राहणं माझं कर्तव्य आणि जबाबदारी


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाके यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची आपण काळजी घेतली असल्याचे सांगितले. शिंदे यांनी मी उद्याच शिष्टमंडळ पाठवतो, अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. दरम्यान  यावेळी बोलताना सगेसोयरे मुद्द्यावरून भाष्य केले. ते म्हणाले की, ओबीसींच्या मागे उभे राहणं माझं कर्तव्य आणि जबाबदारी आहे. सत्ता येत असते, जात असते पण मी पदाचा विचार केलेला नाही. छत्रपती शिवराय, फुले -शाहू-आंबेडकर याची महती राज्यांमध्ये आहे. या पुरोगामी राज्याला धक्का लावण्याचे काम 2014 पासून सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. 


तर मग अध्यादेश कशाला काढता?


दरम्यान, सगेसोयरे मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी उपोषण करत आंदोलन केले होते. त्यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिला आहे. या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांनी सांगितल्यानुसार न्यायालयात तो मुद्दा टिकणार नाही, तर मग अध्यादेश कशाला काढता? अशी विचारणा केली. जे समाज एकमेकांच्या सुख दुःखामध्ये होते ते आता एकमेकांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. आम्ही छोट्या जातींमध्ये आहोत म्हणून एकत्र येत नाही. याचा अर्थ तुम्ही आमच्या छातीवर नाचावं असं नसल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या