अकोला : 'नाफेड'ने 15 एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नसल्याचं पत्र जारी केलं आहे. 16 एप्रिलपासून तूर खरेदीची कोणतीच जबाबदारी आपली राहणार नसल्याचं म्हटलं नाफेडने पत्रात म्हटलं आहे.
बारदाना उपलब्ध नसल्याने अगोदर पासूनच तुरीची खरेदी खोळंबली आहे. त्यातच आता नाफेडने हात वर केल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या फक्त अर्ध्या तूरीची विक्री झाली आहे. अजूनही अर्धी तूर शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
सरकारकडून नाफेडच्या या पत्रावर अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नाफेडला तातडीने बारदाना उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. मात्र नाफेडच्या या निर्णयाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.