पुरंदरच्या प्रस्तावीत विमानतळाला जागा देण्यासाठी 7 गावांचा विरोध, पोलिसांचा लाठीचार्ज, धक्काबुक्कीत वृद्ध महिलेचा जीव गेल्या आरोप
पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमिनी देण्यास तालुक्यातील 7 गावातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

पुणे : पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमिनी देण्यास तालुक्यातील 7 गावातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. जमिनी मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी ग्रामस्थांनी मज्जाव केला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.
पोलिसांना आमच्यावर लाठीचार्ज केला आहे. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्यारती लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचे ग्रामस्थांनी म्हटलं आहे. प्रशासनामुळं आमच्या महिलेचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याआधी अनेक आंदोलने उपोषणे केली मात्र, प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे सुरु
पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचा ड्रोन सर्वे शासनाकडून करण्यात येत आहे. मात्र बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेला विरोध केला आहे. काल ड्रोन सर्वेला आलेल्या अधिकाऱ्यांना गावातील लोकांनी ड्रोन सर्वे बंद करण्यास भाग पाडलं होतं. यानंतर आता पोलीस प्रशासनाच्यावतीने मोठा फौज फाट्यासह सासवड येथे मागवण्यात आला आहे. अजून तरी हे अधिकारी सर्वेसाठी गेलेले नाहीत. मात्र तरी देखील या सात गावातील लोकांनी आपली जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभे करुन ड्रोन सर्वेला येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला आहे.
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी पोलिस आणि काही ग्रमास्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. तसेच काही जण जखमी झाल्याची माहिती देखील मिळत आहे. दरम्यान, या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळं ग्रामस्थ पोलिस प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आमचा जीव गेला तरी चालेल पण विमानतळाला आमचा विरोध राहणारच असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























