Pune : देशात प्रसिद्ध असलेल्या खिरेश्वर (ता.जुन्नर) हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात यश आले आहे. सदर घटना शुक्रवारी (ता.11) दुपारी  तीनच्या दरम्यान घडली होती. काळू धबधबा हा पाच टप्यांत खोल दरीत कोसळत असतो. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक हा पाय घसरुन पडल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. खाली  शेकडो फुट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला होता. पर्यटकांनी त्याला  दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. वाचवणाऱ्या युवकांनी स्कार्फ,ओढणीच्या माध्यमातून दोरी तयार केली होती.

जर या पर्यटकाला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय याठिकाणी आला आहे. सदर व्यक्ती हा पुणे येथून हैद्राबादच्या पर्यटकांना घेऊन आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच त्याला वाचवणारे तरुण हे अहिल्यानगर  जिल्ह्यातील संतोष जाधव, उमेश रासकर, श्रीकांत आबाळे, संदीप गोरे तसेच स्थानिक तुषार मेमाणे, संदीप साबळे, निलेश पाचपिंड हे होते. 

कसा वाचवला पर्यटकाचा जीव

स्थानिक तुषार मेमाणे यांनी सांगितले की सदर व्यक्ती ही काळू नदीचा प्रवाह पार करत असताना पाय घसरून पाण्यात पडला. तसेच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात दरीच्या कडेला अडकला. त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. त्यांच्या सोबत कोणीही गाईड नव्हता. संतोष जाधव यांनी सांगितले की हा तरुण हुल्लडबाजी करत असताना पाण्याच्या प्रवाहात पडला. त्याला वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमच्याकडे कोणतीही दोरी उपलब्ध नव्हती त्याचवेळी आमच्या सोबत असलेल्या वेदांत आबाळे यांनी ओढणी व स्कार्फच्या सहायाने  दोरी तयार केली व त्याला त्या दोरीच्या माध्यमातून आम्ही वाचवू शकलो. जर आम्ही हा प्रयत्न केला नसता तर तो तरुण खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडला असता.

बेशिस्त पर्यटकांमुळेचे पर्यटनाला गालबोट

नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांमुळेचे पर्यटनाला गालबोट लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काळू धबधबा ज्याठिकाणी कोसळतो त्याठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी वाढत चाललेली आहे. खाली खोल दरीत धबधब्याचे पाणी पडतानाचे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांची पावले याकडे वळू लागली आहेत. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी स्वतःच्या जीवाची परवा न करता काही पर्यटक हे दरीच्या अगदी कडेला जाऊन फोटो,सेल्फी,रील काढताना दिसतात.तसेच काळू नदीचे पात्र ओलांडून पर्यटक दुसऱ्या बाजूला जात असताना त्यांचे पाय घसरून ते पाण्यात पडल्याच्या घटना यापूर्वी याठिकाणी घडलेल्या आहेत. तसेच याठिकाणी धबधब्यात पडून मृत्यू देखील झालेले आहेत. दैनिक सकाळच्या माध्यमातुन आपण या पुर्वी देखील येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने रेलिंग लावणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. तसेच पावसाळ्याच्या काळात सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने प्रशासनाचे व्यक्ती  पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे असणे गरजेचे आहे. पर्यटकांनी देखील अशा अवघड ठिकाणी जाताना स्वतःच्या जीवाची काळजी घेऊनच पर्यटन करणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! पूल कोसळल्यानं इंद्रायणी नदीत 25 ते 30 पर्यटक बुडाले, बचावकार्य सुरु, नेमकी कशी घडली घटना?