Pune Shivai Bus :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) पुण्यातील मुख्यालयात 10 नवीन इलेक्ट्रिक शिवाई बस दाखल झाल्या आहेत. मात्र, या ई-बस कोणत्या मार्गावर धावतील आणि त्यांना कोणती स्थानके दिली जातील, याबाबत माहिती देण्यात आली नाही आहे. या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि गारेगार होणार आहे.


MSRTC मध्ये दुसऱ्या टप्प्यातील इलेक्ट्रिक शिवाई बसेस येण्यास सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील बसेस दाखल झाल्या आहेत. यातील एक बस पुणे-छत्रपती संभाजीनगर मार्गावर धावणार आहे. अशा आणखी बसेस आणण्याचा प्रशासनाचा विचार आहे. बस पुण्यात आल्यावर एमएसआरटीसीच्या उपमहाव्यवस्थापक यामिनी जोशी यांनी पहिल्या बसची पाहणी केली. तसेच या नव्याने आलेल्या बसेस आरटीओ कार्यालयातील सर्व औपचारिकता पार पाडल्यानंतरच एमएसआरटीसीमध्ये रुजू होतील, अशी माहिती परिवहन अधिकारी कैलास पाटील यांनी दिली. ही बस एका चार्जवर 300 किलोमीटर धावते.


बसमध्ये सात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह चालकासमोर अनाऊंसमेंट सिस्टीम असेल. यात प्रवाशांच्या सामानासाठी पुरेशी जागा आणि पॅनिक बटणाची सुविधाही असेल. बसमध्ये प्रत्येक सीटजवळ फूट दिवे आणि रीडिंग लाइट यांसारख्या सुविधा तसेच एसी, प्रवाशांसाठी टीव्ही आणि थांब्यांची माहिती देणारे विद्युत दिवे बोर्ड बसविण्यात आले आहेत.


नव्या ई-शिवाईत या सुविधा


अनाउन्समेंट सिस्टीम (चालकासमोर माईक)
सात सीसीटीव्ही


प्रवाशांचे सामान ठेवायला जागा
प्रशस्त आसनव्यवस्था
पॅनिक बटन सुविधा फुट लॅम्प
प्रत्येक आसनाजवळ रीडिंग लाईट्स
पावरफुल एसी
प्रवाशांकरिता गाडीमध्ये टीव्ही
थांब्यांची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिक लाईट्स फलक


पुणे-नगर मार्गावर पहिली शिवाई धावली



1 जुन 2022 रोजी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस (Electric Bus) शिवाई (Shivai) धावली होती. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar)  हस्ते या बसचे पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर उद्घाटन करण्यात आलं होतं. पुणे- नगर (Pune Nagar) मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरु केल्यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला होता. पुढील दोन वर्षात एसटी महामंडळाच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात शिवाई बसेस दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. प्रत्येक जिल्ह्यात शिवाई धावणार असा एसटी महामंडळाचा विचार होता. सर्वाधिक चालणाऱ्या मार्गावर शिवाई बस अधिक प्रमाणात चालवल्या जातात. 



'जिथे गाव, तिथे एसटी' अशी संकल्पना अनेक वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते. पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे येत्या काळात एसटीच्या दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे.