PM Modi Pune Visit: देशात विरोधी पक्षांची एकजूट दिवसेंदिवस बळकट होत असताना आता शरद पवार यांच्या एका निर्णयामुळे विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मित्रपक्ष असणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील यावर नाराज असल्याची माहिती आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्टला पुण्यात टिळक स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे याच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांच्या याच निर्णयामुळे आता विरोधी पक्षात नाराजीचा सूर निर्माण झाल्याची चर्चा आहे.


देशात मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षावर सातत्याने जोरदार टीका केली आहे. मात्र तरी देखील सत्ताधारी पक्षाकडून कुठल्याही प्रकारची भूमिका मणिपूर बाबत जाहीर करण्यात आलेली नाही. या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांचे एक शिष्टमंडळ नुकतच मणिपूरला गेलं होतं.


देशपातळीवर विरोधकांची फळी मोदींना जोरदार विरोध करत असताना राज्यात शिवसेना ठाकरे गट देखील या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात भूमिका घेत आहे. अशावेळी शरद पवार यांनी मोदींसोबत कार्यक्रमात सहभागी होण्याच्या निर्णयावर ठाकरे गटात नाराजी आहे. शरद पवार यांच्या या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे, मंगळवारी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून देखील जोरदार टीका करण्यात येणार असल्याची चर्चा आहे 


विरोधी पक्षाच्या पार पडलेल्या बैठकीत शरद पवारांच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शरद पवारांनी नरेंद्र मोदींसोबत कार्यक्रमात एकत्र जाऊ नये अशी काही विरोधी पक्षातील नेत्यांची इच्छा असल्याची माहिती आहे. किंबहुना याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांना याबाबतची विनंती करावी अशी देखील इच्छा व्यक्त केली होती. 


मागील काही दिवसात अदानी असो, शेतकऱ्यांबाबतचे तीन काळे कायदे, राफेल डील आणि आता मणिपूरचा मुद्दा विरोधकांकडून मोठा केला जात असताना त्यामध्ये वेगळी भूमिका घेण्याचा काम शरद पवारांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा मणिपूरचा मुद्दा मोठा असताना शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र येणार हे विरोधी पक्षाला आवडलेलं नाही. रविवारी एका सार्वजनिक मंचावर बोलताना शरद पवार म्हणाले होते की, जर विरोधी पक्ष एकजुट राहिला तर 2024 मध्ये देशात मोठा बदल घडू शकतो. पण तेच पवार आता मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहत असल्याने नेमकं पवार यांची भूमिका काय आहे हा देखिल चर्चेचा विषय बनला आहे.


ही बातमी वाचा: