पुणे: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  इस्लाम हाच देशाचा खरा शत्रू, असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य  संभाजी भिडेंनी केलंय. जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याची देशद्रोही वृत्ती देशातल्या सुशिक्षितांमध्ये असल्याचंही ते म्हणाले. संभाजी भिडेंच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


संभाजी महाराज बलिदानासंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी संभाजी भिडेंनी बोलत होते. संभाजी भिडे म्हणाले की, "औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या ही इस्लामच्या पोटतिकडीतून केली. संभाजी महाराजांची हत्या ज्यामुळे झाली तो इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू आहे." 


संभाजी भिडे पुढे म्हणाले की, "औरंगजेब आणि संभाजी ही दोन माणसं होती. त्यांचं एकमेकांशी वैर होतं म्हणून औरंगजेबानं संभाजी महाराजांना मारलं नाही. कन्याकुमारी ते काश्मीर असा देश तुकडे-तुकडे करुन हिंदू धर्म आणि हिंदू समाज संपवून टाकावा अशी त्याची भावना होती. संभाजी महाराजांची हत्या करुन त्याने अंशत: समाधान मिळवलं."


संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी गोष्ट आहे. ती आपण करुया आणि एक दिवस असा उजाडावा की झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा रहावा ही अंतकरणामध्ये भावना धरुन आपण वाटचाल करत राहूया असं आवाहनही भिडेंनी केलंय.


संभाजी भिडेंनी या आधीही वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य करुन अनेकदा वाद ओढावून घेतले आहेत. आता इस्लाम धर्मावरील वक्तव्याने आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


संबंधित बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha