Vasant More : मनसेचे पुण्याचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी भोंग्याच्या विषयावर पून्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या भागातील मुस्लिम बांधव मला सहकार्य करतात. त्यामुळे भोग्यांच्या बाबतील कोणत्याची तक्रारी आल्या नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यंदाच्या गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना पून्हा एकदा भोंग्याच्या विषयाला हात घातला होता. त्यानंतर मागील वर्षी या भोग्याला विरोध करणारे वसंत मोरे यंदा काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं.


गुढीपाडव्याच्या सभेनंतर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे वसंत मोरे यांच्या एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वसंत मोरेंशी चर्चा केली. त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली मागील काही दिवसांपासून वसंत मोरे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा रंगण्याचं कारणच मुळात भोंगा होतं.


राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसाबाबत गुढीपाडव्याच्या सभेत भूमिका जाहीर केल्यानंतर निषेधाचा पहिला सूर वसंत मोरे यांच्या रुपाने उमटला. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष असलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण होत असल्याचं म्हटलं होतं. या भूमिकेनंतर त्यांची मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टीही झाली होती. मात्र त्यानंतर वसंत मोरेंची नाराजी दूर करण्याचा दावा मनसेकडून करण्यात आला होता. तरीही भोंगे आंदोलनात वसंत मोरे मात्र कुठेच सक्रिय दिसत नव्हते. त्या दरम्यानच्या काळात काही तास ते नॉट रिचेबलदेखील होते. 


राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरे यांनी शहरातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना त्यावेळी निमंत्रण नव्हतं. यानंतर पुणे मनसे शहराध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करत साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली. या सगळ्या घडामोडींनंतर वसंत मोरे यांनी 7 एप्रिल 2022  ला राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीला त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. त्यानंतर 11 एप्रिल 2022 रोजी राज ठाकरे आणि वसंत मोरे यांची भेट झाली होती. पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर वसंत मोरे इतर पक्षात जाणार अशी चर्चा रंगली होती. शिवाय वसंत मोरे यांनीही आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. परंतु मनसे सोडून जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.