Prashant jagtap :  पुण्यात सध्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीची चांगलीच चर्चा रंगत आहे. मात्र यापेक्षा भावी खासदार म्हणून लावण्यात येत असलेल्या बॅनर्सची जास्त चर्चा रंगत आहे. पुण्याच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी राष्ट्रवादीने दावा केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant jagtap) यांचं भावी खासदार असा उल्लेख असलेलं बॅनर शहरात सगळीकडे झळकत आहे. मात्र या बॅनरवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचं नावच चुकीचं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक पुणेकर या नावावरुन राष्ट्रवादीची खिल्ली उडवताना दिसत आहे. 


पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाची सध्या शहरात जोरदार चर्चा आहे. त्यांचे भावी खासदार असा  उल्लेख करणारे बॅनर्स शहरात लावण्यात आले आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर्स आहेत. याच बॅनरमध्ये ही चूक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी असं लिहिण्याऐवजी "राष्ट्रवादी कॉंग्रेस पाट्री' असं लिहिण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात हे पोस्टर्स लावले आहेत मात्र पक्षाचं नावच चुकीचं लिहिण्यात आलं आहे. 


यापूर्वीदेखील प्रशांत जगताप यांचे बॅनर्स भावी खासदार म्हणून लावण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी ते म्हणाले होते की, "लोकसभेच्या जागेसाठी मी इच्छुक आहे. त्यामुळे भावी खासदार म्हणून कार्यकर्त्यांनी पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. मला जर महाविकास आघाडीने आणि राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली तर मी नक्की निवडणूक लढवेन. उमेदवारी दिली नाही तर पक्षाच्या आदेशानुसार कॉंग्रेसच्या नेत्यासाठी काम करेन," असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 


...भाजप काय उत्तर देणार?



खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर दोनच दिवसांत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्या बॅनरवरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बॅनरवरुन भाजपचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बॅनरवर थेट पक्षाचं नावच चुकीचं लिहिल्याने भाजप यावर कोणती भूमिका घेणार?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.



महाविकास आघाडीकडून या नावांची चर्चा!


महाविकास आघाडीकडून उमेदवाराची चाचपणी सुरु झाली आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याची चिन्ह आहेत. त्यासाठी तीन नावांची चर्चा आहे. काँग्रेसचे अरविंद शिंदे, मोहन जोशी आणि रविंद्र धंगेकर या तीन नावांची चर्चा सुरु आहे. आतापर्यंतच्या निवडणुकींचा इतिहास पाहिला तर भाजपचा उमेदवार बघूनच महाविकास आघाडी किंवा विरोधात असलेला पक्ष उमेदवाराची घोषणा करतात. त्यामुळे ब्राह्मणांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीदेखील त्याच पट्टीच्या नेत्याला उमेदवारी देण्याची शक्यता आहे.