Supriya Sule On Navle Bridge : नवले पुलावर (Navle bridge) अपघाताची मालिका सुरुच आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न थेट संसदेत (Parliament) उपस्थित करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. रस्त्याला असलेला तीव्र उतार या अपघातांना कारणीभूत असल्याचा सांगत सुप्रिया सुळे (Supria Sule) यांनी या पुलाबाबतील उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नितिन गडकरींच्या मंत्रालयाकडे हे अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करा, अशी मागणी त्यांनी संसदेत केली आहे.


मागील महिन्यापासून पुण्यातील नर्हे परिसरात नवले पुलावर सातत्याने अपघात होत आहेत. हे अपघात पुलाची रचना नीट नसल्याने होत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांच्या गाड्यांचंदेखील मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे हा पूल अपघाताचा पूल म्हणून ओळखला जात आहे, लोकांचा जीव रोज धोक्यात आहे. त्यामुळे या पुलाबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


सर्व्हिस रोडची गरज
पुण्यात मागील काही दिवसांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात प्रत्येक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळते. शिवाय खड्ड्यांचं प्रमाणदेखील वाढलं आहे. या दोन्हीमुळे शहरात अनेक अपघात होतात. महापालिकेकडून यावर मागील काही वर्षांपासून उपाययोजना राबवण्यात येत आहे. मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्न आ वासून आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या पुलाजवळ वाहतूक कोंडी होते. तीव्र उतार असल्याने वाहनावरचं नियंत्रण सुटतं आणि अपघात होतात. मात्र हे सगळं थांबवायचं असेल तर सर्व्हिस रोडची गरज आहे, असं त्यांनी संसदेत म्हटलं आहे. 


महामार्गावर पोलीस गरजेचे
महामार्गावर अनेक अपघात होतात. नवले पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झाले, मात्र पोलिसांना यासंदर्भात उशीरा माहिती मिळते. त्यामुळे या सगळ्या महामार्गावर पोलीस तैनात करण्याची गरज आहे. आतापर्यंत पोलीस, एनएचएआय आणि महापालिकेकडून या पुलावर अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या. मात्र अपघाताचं प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. पुणे-बेंगलोर हा महत्वाचा आणि मोठा महामार्ग आहे. त्यामुळे या नवले पुलाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुलाबाबत ठोस उपाययोजना कराव्या आणि अनेकांचे जीव वाचवाचे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्यामुळे आता नवले पुलाबाबत काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.