Pune Suicide News : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज गर्जे असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. राजच्या मित्रावर राजला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज आणि निरूपम जोशी यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास त्रास देत होता. वेळोवेळी होणार्या त्रासाला कंटाळून राजने मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केली.
या प्रकरणी राजच्या घरावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. अत्यंत गरीब घरातून आलेला माझा भाऊ असे टोकाचे पाऊल का उचलेल हेच आम्हाला समजत नसून हा मोठा धक्का आम्ही पचवू शकत नाही, अशी खंत राजच्या भावाने व्यक्त केली आहे. दुसऱ्या बाजूला, आम्हाला मिळालेल्या स्टेटमेंट वरून हा रॅगिंगचा प्रकार दिसत नाहीये मात्र आम्ही त्या अनुषंगाने देखील या संपूर्ण घटनेचा तपास करत आहोत असे चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी म्हटले आहे.
ज्या वयात मुलं आयुष्याचे नव्या पर्वाची सुरुवात करत असतात, त्याच वयात मात्र राजने स्वतःचं जीवन संपवले. राजने तणावात येऊन हे टोकाचे पाऊल उचलले. आता राजच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या त्याच्या मित्राला आत्महत्या करण्यास प्रवृत्ती केल्याप्रकरणी काय शिक्षा होईल?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
तरुणांच्या आत्महत्येत वाढ झाल्याचं मागील काही दिवसांत घडलेल्या घटनांमधून समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (BJ Medical College) अदिती दलभंजन या 20 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने वाचवण्यात यश आलं नव्हतं. नैराश्यात असल्याने तिने टोकांचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
नैराश्येतून आत्महत्येत वाढ
सध्या पुणे शहरात आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे. क्षुल्लक कारणावरुन अनेक तरुण आत्महत्येचं पाऊल उचलताना दिसत आहे. कोरोनानंतर अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. सोशल मीडियामुळे नैराश्य वाढत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अनेकांनी शारिरीक आणि मानसिक आरोग्य जास्त प्रमाणात जपावं, असं आवाहन तज्ञांनी केलं आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.