Pune Bhide Wada :  पुणे शहरातील भिडेवाडा (pune) या राष्ट्रीय स्मारकाचे (bhide wada) पुढील दोन महिन्यात भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात यावी, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनातील बैठकीत दिली आहे. तर वॉर फुटिंगवर काम करून मनपा आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी तातडीने नियोजन करून हे काम मार्गी लावावे, असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या प्रश्नासंबंधित माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे. 


भिडे वाड्याच्या प्रश्नावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, तसेच अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, अप्पर मुख्य सचिव नगरविकास, अप्पर मुख्य सचिव वित्त,प्रधान सचिव पर्यटन, प्रधान सचिव संस्कृतिक कार्य,मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे मनपा आयुक्त आणि गाळेधारक व्हिडीओ कॉन्फर्सिंगद्वारे उपस्थित होते.


या बैठकीत छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणजे स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका फुले दाम्पत्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून शिक्षणाची कवाडं उघडली. मात्र काळ सरला आणि हीच प्रेरणादायी शाळा अक्षरशः भग्नावस्थेत गेली. जागेचं प्रकरण न्यायालयात गेलं आणि खटला वर्षानुवर्षे सुरु राहिला. आता मात्र हा वाद आपल्याला मिटवला पाहिजे अशी मागणी त्यांनी या बैठकीत केली आहे. 


महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याने मुलींची पहिली शाळा 1 जाने 1848 रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज हिंदुस्थानात रोवले असणे, शुद्रातिशूद्र समाजासाठी ज्ञानाची कवाडे खुली करून शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती घडवून त्यानंतर मोठा संघर्ष करून अनेक महिला शाळा त्यांनी सुरू केल्या त्याच सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेची आज दुरवस्था पहावत नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.


बाबा आढावांच्या उपोषणाला यश
पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पुण्यात उपोषण करण्यात आलं होतं. जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव (baba adhav) यांच्या उपस्थितीत हे उपोषण झालं होतं. सावित्रीच्या लेकी या संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. भिडे वाड्याची दुरवस्ता झाली आहे. ज्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटली त्याच वाड्यात आता उभं राहणंदेखील कठीण झालं आहे, त्यामुळे त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा आणि त्याचा विकास करावा अशी मागणी बाबा आढाव यांनी केली होती. त्यानंतर छगन भुजबळांनीदेखील यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. 


जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांच्या आत भूमिपूजन करण्याची तयारी करण्यात यावी, यासाठी आवश्यक ती सर्व तयारी अधिकाऱ्यांनी करावी अशा सूचना दिल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉर फुटिंगवर काम करून गाळेधारकांसोबत तातडीने बैठक घेऊन मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने अहवाल सादर करावा असे आदेश दिले.