Pune New Year : 31 डिसेंबरला पुण्यातील रेस्ट्रोबार (Pune) पहाटे पाच वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांचं नवं वर्ष धुमधड्याक्यात साजरा होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात रेस्ट्रोबार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्री दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 


नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यात कोरोनामुळे दोन वर्ष 31 डिसेंबरला निर्बंध घालण्यात आले होते. यावर्षी निर्बंधमुक्त नव्या वर्षाचं स्वागत करता येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. यंदाही त्याच उत्साहात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक आतूर आहेत.


पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र या दिवशी पुण्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी राज्य शासनाच्या निर्णयाची पुण्यात योग्यरित्या अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. या दिवशी बनावट मद्यविक्री, वाहतूक आणि उत्पादन होऊ नये, म्हणून विभागाची नेहमीची 14 आणि त्यांच्यासोबतच आणखी दहा अशी एकूण 24 पथकं कार्यरत असणार आहे. या सगळ्या प्रत्येक पथकात दोन अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबतच दोन उपअधीक्षक देखील असणार आहे. 


हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्सवर कोणतेही नवीन निर्बंध जारी केलेले नाहीत. उत्सवाबाबत आम्ही हॉटेल मालकांच्या बैठका घेतल्या आहेत आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी, आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवणार आहोत, असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.


नवं वर्ष धुमधड्याक्यात साजरं करा; तानाजी सावंत


कोरोनाला महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तुम्हीही कोरोना नियमांचं पालन करत ख्रिसमस, वर्षाअखेर आणि नवीन वर्षाचं धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. कोरोनाची खबरदारी म्हणून कोरोना यंत्रणा पुन्हा सक्रिय केली जाणार आहे. 27 तारखेला आधीची यंत्रणा कशी होती, त्यासाठी मॉकड्रील ठेवलं आहे, असे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यंदा नव नवर्षाचं स्वागत सगळीकडे जल्लोषात होणार आहे.