पुणे : पुण्यातील पालखी सोहळ्याच्या स्वागतावरुन महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. शहरात पालखी मुक्कामी असताना महापालिका प्राशासनाने योग्य नियोजन न केल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

पुणे शहरात दरवर्षी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखीचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केलं जातं. या पालखी सोहळयाचे वेध लागताच शहरातील विविध स्वंयसेवी संस्था आणि महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जाते. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होता कामा नये, याची विशेष काळजी घेतली जाते.

मात्र यंदा महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचं नियोजन न केल्याने वारकऱ्यांना मंडप आणि पाण्यापासून वंचित राहावं लागल्याची बाब समोर आली आहे.

या सोहळयासाठी केवळ 56 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. पण हे कसलं नियोजन असा प्रश्न विचारत शिवसेना गटनेते संजय भोसले आणि काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी सभात्याग केला. तर राष्ट्रवादीनेही निषेध व्यक्त केला.

महापौर मुक्ता टिळक या प्रशासनाला पाठीशी घालत असल्याचाही आरोप सर्वसाधारण सभेत करण्यात आला.