पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंत भाज आणि शिवेसना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा सुरुच राहिलेली. त्यामुळं भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली असं म्हणता येणार नाही. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार असं नेत्यांनी सांगितलं तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच दिसायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे नेत रविंद्र धंगेकर विरुद्ध गणेश बीडकर असा सामना होणार आहे. कारण, माजी आमदार रविंद्र धंगेकरांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मधुन तर मुलगा प्रणव याने प्रभाग क्रमांक 24 मधुन निवडणूक अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं 2017 ची पुनरावृत्ती होणार का? असा सवाल उपस्तित केला जातोय.
प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचा सामना भाजपच्या उमेदवारांसोबत होणार
भाजप आणि शिंदे सेनेची युती न झाल्याने प्रभाग क्रमांक 23 आणि 24 मध्ये धंगेकरांचा सामना भाजपच्या उमेदवारांसोबत होणार आहे. प्रणव धंगेकरची लढत भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्या विरुद्ध असणार आहे. 2017 मधील नगरसेवकपदाच्या निवडणुकीत रविंद्र धंगेकरांनी गणेश बिडकरांचा पराभव केला होता. यावेळी गणेश बिडकरांच्या समोर रविंद्र धंगेकरांचा मुलगा प्रणवचे आव्हान असणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा धंगेकर आणि बीडकर आमने सामने येणार आहेत.
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावरच
पुणे महापालिकेच्या 165 जागांच्या निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आमदार रोहित पवार यांनी देखील पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं सांगितलं होतं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहे. मात्र, पुण्यात अजि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. शरद पवारा़ंचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुण्यात नक्की किती जागा लढवणार हे अंकुश काकडेंनी अनेकवेळा विचारुन देखील सांगितलेलं नाही. 70 पेक्षा अधिक ए बी फॉर्म वाटल्याचे काकडे म्हणालेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.
पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीला देखील फारसा अर्थ उरलेला नाही. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील युती जशी फक्त कागदावरच राहिली तशी बहुचर्चित दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी देखील फक्त कागदावरच राहिल्याचं स्पष्ट झालं आहे.
Municipal Corporation Election 2026 : महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026