Pune Metro :  देशात रेल्वे सुरू झाल्यानंतर पहिली महिला चालक येण्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती पण पुणे मेट्रोमध्ये पहिल्या दिवसापासून सात महिला मेट्रो चालवत आहेत. या सातही महिला पायलटचे प्रशिक्षण पूर्ण झालं आणि त्या मेट्रो चालविण्यास सज्ज झाल्या. पंतप्रधानांनी ज्या मेट्रोला झेंडा दाखवला त्या मेट्रोचे सारथ्यदेखील एका महिला पायलटने केले. सात पायलट पैकी एक आहेत शर्मिन शेख. शर्मिन शेख यांच्या सोबतच गीतांजली थोरात, सविता सुर्वे, पल्लवी शेळके, पूजा काळे, प्रतीक्षा माटे, अपूर्वा आलटकर यादेखील मेट्रो चालवतात.


शर्मिन शेख मेकॅनिकलचा डिप्लोमा केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना 45 दिवस मेट्रो चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आले आहे. सायकल चालवायला घाबरणाऱ्या या शर्मीन शेख आत्मविश्वासाने मेट्रो चालवत आहेत. शर्मिनच्या कुटुंबातील मुलींना घराबाहेर पडण्याची परवानगीही नाही पण वडिलांच्या पुढाकाराने शर्मिन मेट्रोचं सारथ्य करते. 


महिला आपल्या मेट्रोचे सारथ्य करताना पाहून पुणेकरांना ही अभिमान वाटत आहे. एक मुलगी मेट्रो चालवते हे पाहून आपल्याही मुलीने, असं काहीतरी करावं अशी भावना प्रत्येका पुणेकराच्या मनात येत आहे. मेट्रोकडे एकूण 54 ट्रेन पायलट आहेत. त्यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. या सर्वांना मेट्रोकडून पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करायचे, याचेदेखील या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाने रिकामी मेट्रो चालवून अनुभवदेखील घेतला आहे. काही जण गेल्या वर्षी सुरू झालेल्या मार्गांवर मेट्रो चालवत आहेत.


मेट्रो प्रवास सुसाट, पुणेकर खूश


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मेट्रोच्या विस्तारीत सेवेला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी 5 पासून मेट्रोची सेवा सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत ही सेवा सुरू होती. यात त्यात वनाज ते रुबीहॉल मार्गावर 7 हजार 456 आणि सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मनपा मार्गावर 5,462 जणांनी प्रवास केला आहे. बुधवारी (2 ऑगस्ट) सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गांवर सुमारे 27 हजार 772 जणांनी प्रवास केला आहे. त्यात वनाज ते रुबीहॉल मार्गावर सुमारे 17 हजार 917 तर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड मार्गावर 9 हजार 855 जणांनी प्रवास केला आहे. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी मेट्रोच्या प्रवाशांमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाल्याचे चित्र आहे.


 


हेही वाचा-


Pune Metro : अखेर पुणेकरांसाठी मेट्रो सुसाट; मोदींच्या हस्ते मेट्रोच्या दोन मार्गिकांचं लोकार्पण, तिकीट दर किती अन् काय आहेत वैशिष्ट्ये?