Pune power electricity : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) 400 केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाबाची एक वीजवाहिनी तुटल्याने आज (दि. 8 जुलै) सकाळी 9 च्या सुमारास पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. मात्र पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्यामुळे तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीचा भार इतर वीजवाहिन्यांवर देण्यात आला आणि भारव्यवस्थापनाद्वारे या सर्वच भागात दुपारी 12: 45 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव 400 केव्हीच्या अतिउच्चदाबाच्या चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी 9 वाजता तुटली. त्यामुळे सुमारे 355 मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले होते. मात्र पावसामुळे विजेची मागणी कमी झाल्याने इतर वीजवाहिन्यांवर हा भार देत भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण व महापारेषणला यश आले. त्यामुळे बाधीत झालेल्या पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ, रांजणगावचा काही भाग आदी परिसरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने दुपारी 12: 45 पर्यंत सुरु करण्यात आला. त्यामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, पॉवर ग्रीडच्या तुटलेल्या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज सायंकाळी या वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर इतर वाहिन्यांवर देण्यात आलेला वीजभार या वाहिनीवर पूर्ववत देण्यात येईल, असं संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलं आहे.
पाच तास वीजपुरवठा ठप्प
पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब 400 केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होतं. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान महापारेषण आणि महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु होतं. तर काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र पाच तासात वीजपुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
नागरिकांचे हाल...
सकाळी कामाच्यावेळी विजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे काही परिसरातील नागरीक चांगलेच संतापले होते. त्यानंतर पाच तासांनी विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
हेही वाचा-