पुणे :पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा परिसरात पोलिसांनी मोठी कारवाईकेली आहे. अवैध दारु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले असता, तिथे दारुपेक्षा मोठी रोकड आढळून आली आहे. एका बंद कपाटात तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी काही संशयितांना घेतलं ताब्यात
दरम्यान, या प्रकाराची तात्काळ माहिती पोलिसांनी आयकर विभागाला दिली असून, इन्कम टॅक्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, रोकड नेमकी कुणाची आहे? कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आली होती? आणि निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का? याबाबतची सखोल चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वीच ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं या संदर्भात पोलीस कसुन चौकशी करत आहेत. या प्रकरणाचा निवडणुकीशी काही संबध आहे का? एवढी रक्कम एकाच ठिकाणी का ठेवली असावी? याबाबतची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.
तब्बल 1 कोटी 85 हजार 950 रुपये इतकी रोख रक्कम सापडल्याचं पोलिसांनी केलं स्पष्ट
कोंढव्यातील काकडे वस्तीत पोलिसांच्या कारवाईत मोठा धक्का बसला आहे. अवैध मद्यसाठ्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस गल्ली क्रमांक दोनमधील एका घरात पोहोचले असता, सुरुवातीला काही मद्यसाठा जप्त करण्यात आला. मात्र, पोलिसांनी घरातील कपाट उघडताच सर्वांनाच धक्का बसला. कारण या कपाटात कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी रक्कम मोजली असता तब्बल 1 कोटी 85 हजार 950 रुपये इतकी रोख रक्कम सापडल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतलं असून, ही रक्कम नेमकी कुठून आली, याचा तपास सुरू आहे. अवैध मद्यविक्री आणि पैशांच्या स्रोताबाबत पोलिस सखोल चौकशी करत आहेत.
एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार, 15 जानेवारीला मतदान होणार
राज्यातील गेल्या 7 वर्षांपासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगानं 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील मुदत संपलेल्या 27 महापालिकाची आणि नव्यानं तयार झालेल्या 2 महापालिका अशा एकूण 29 महापालिकांसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 या दिवशी मतदान पार पडणार आहे. तर 16 जानेवारी 2026 या दिवशी मतमोजणी पार पडेल. आजपासून 29 महापालिकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यानं प्रचाराच्या कार्यक्रमांना वेग येणार आहे. घरोघरी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठींचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. दरम्यान, या महापालिका निवडणुकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत अशातच मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचीही युती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा देखील सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Sangli Crime : सायबर चोरट्यांची नवी शक्कल, म्युल अकाउंटमधून मोठी सायबर लूट, 34 डेबिट कार्ड, 27 सिमसह सांगलीत संशयित अटकेत