मुंबई :  महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी आळंदी परिसरातील अनधिकृत वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी सुरू केली आहे. पुढील दोन दिवसात 20 समिती  सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर करणार आहेत. 


नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश


आळंदी परिसरात वारकरी विद्यार्थी वसतीगृहांमध्ये होणाऱ्या बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भात आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी आळंदी पोलीस स्टेशन येथे आढावा बैठक घेत परिसरातील वारकरी शिक्षण संस्थांची पाहणी केली होती. नोंदणी नसलेल्या, नियमावलीचे पालन न करणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. 


त्यानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी ३ सदस्यांचा सहभाग असलेल्या २० समिती स्थापन केल्या असून दिनांक ६ आणि ७ फेब्रुवारी या दोन दिवसात शिक्षण संस्था, वसतिगृहे यांची सखोल तपासणी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितींना दिले आहेत. या २० समिती ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, पुणे यांना आपला अहवाल सादर करणार आहेत. यासाठी यादी तसेच विहित नमुना ही तयार करून देण्यात आला आहे. अध्यक्ष आणि दोन सदस्य अशी तीन सदस्यांच्या एकूण वीस समिती नेमण्यात आल्या असून यात गट शिक्षण अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नायब तहसीलदार, प्रशासन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, विधी सल्लागार, शिक्षक, मुख्यसेविका यांचा समावेश आहे. 


अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल - चाकणकर 


समिती स्थापन झाल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये सुरू असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असून मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन हे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय तिथे पोलिस तपास करत आहेत. आता समिती मार्फत सर्व अनधिकृत संस्थांचा सखोल तपास होणार आहे.  सर्व २० समितीचा अहवाल आणि त्यावरील एकत्रित अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात येईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


भाजपला 39 ते 44 जागा, दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, चाणक्यचा सर्व्हे समोर


Antilia Bungalow electricity bill : मुकेश अंबानींच्या आलिशान अँटेलिया बंगल्याचं महिन्याचं लाईट बील किती? आकडा वाचून डोळे विस्फारतील