प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण?
हडपरच्या गाडीतळाजवळ धावत्या ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने कार चालक अजित आत्माराम इंगळेचा होरपळून मृत्यू झाला होता. ग्लायडिंग सेंटरजवळ सकाळी साडे सहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली होती.
संबंधित मारुती व्हॅन ही गॅसकिटवर चालणारी असल्यामुळेच कारला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
मात्र अधिक तपासानंतर अजितने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आली आहे.
गाडीत कोंडून घेऊन आत्मदहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंगळे याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाबाबत तरुणीच्या घरच्यांना विचारले होते. परंतु कुटुंबीयांनी नकार दिला होता. त्यानंतर या तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत 20 डिसेंबर 2015 रोजी लग्न झाले होते. तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिने इंगळेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, त्याने पुन्हा तिचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली. तरुणीशी पुन्हा संपर्क साधून त्याने लग्न करण्याची तयारी दर्शवली. त्याच्याशी लग्न न केल्यास घरासमोर आत्महत्या करण्याची तो धमकी देत होता.
गुढी पाडव्याच्या सणासाठी ही तरुणी माहेरी आली होती. याची माहिती मिळताच इंगळे फलटणवरुन एक मोटार घेऊन पुण्यामध्ये आला. तिच्या घरासमोरील रस्त्याच्या दुस-या बाजूला मोटार उभी केली. मोटारीच्या काचा बंद केल्यानंतर त्याने दरवाजे लॉक करुन घेतले. मोटारीमध्येच त्याने स्वत:ला पेटवून घेतले. गाडीमधून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्यावर नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाऱ्यामुळे आग आणखीनच भडकली. या आगीत अजित इंगळेचा मृत्यू झाला.