Pune Weather Forecast :  पुण्यासह राज्यात पावसाने अखेर (Pune Weather Forecast) हजेरी लावली आहे.  येत्या काही दिवसात मुसळधार पावसाठी शक्यता आहे. त्यामुळे पुणे येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी शहर आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Pune Weather Forecast : नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन


मध्यम ते तीव्र आणि अगदी तीव्र पावसाच्या सरी येण्याच्या शक्यता असल्याने या पावसासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसाच्या काळात धुक्यामुळे त्रास होऊ शकतो आणि रस्ते निसरडे होऊ शकतात. ज्यामुळे खड्ड्यांची संख्या वाढू शकते. वाहन चालकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं, सावकाश वाहन चालवण्याचं आणि रहदारीच्या भागाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 


Pune Weather Forecast : 'घाटात जाताना खबरदारी घ्या'


 
पावसामुळे येत्या काही दिवसांत धुक्याचं प्रमाणदेखील वाढू शकतं त्यामुळे  शहरालगच्या घाट असलेल्य़ा भागात जाणे टाळावे. या भागांमध्ये 30 ते 35 किमी प्रतितास वेगाने मध्यम जोरदार वाऱ्यांसह जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. घाटात खबरदारी बाळगण्याची गरज आहे. त्यात लोणावळा, खंडाळा, घिवशी, असनी माजई, आडोशी बोगदा, कार्ले, भाजे, दुधीवरे खिंड, उरसे खिंड, ताम्हिणी, मुळशी, लवासा, दासवे घाट, कडवे खिंड, पाबे घाट, कुरुंगवाडी, जांभळी, सिंहगड, कात्रज, माळीण, भोरगिरी, हडसर, कोल्हेवाडी, भुलेश्वर, पिंपळगाव जोगा, माळशेज घाट या घाटांचा समावेश आहे. 


Pune Weather Forecast : 'अधिकाऱ्यांनादेखील सूचना'


शिवाय, येत्या काही दिवसांत सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. झाडे उन्मळून पडण्याचा धोकाही आहे आणि हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे तात्पुरत्या बांधकामांना भेगा पडू शकतात. त्यामुळे त्यांनादेखील काळजी करण्याचं आवाहन केलं आहे. अतिवृष्टीशी संबंधित संभाव्य धोके कमी करण्यासाठी स्थानिक अधिकारी आवश्यक खबरदारी घेत आहेत. ड्रेनेजची योग्य व्यवस्था आहे याची खात्री करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि पाणी साचणे कमी करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची त्वरित दुरुस्ती केली जात आहे. मात्र नागरिकांनीदेखील खबरदारी घेण्याची गरज असल्याचं हवमान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.