मुंबई: बंगालच्या उपसागरातून आलेले फेंजाल नावाचे चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे संपूर्ण देशातील हवामानावरती त्याचा परिणाम दिसून येत आहे. बाष्पयुक्त वार्‍यांमुळे राज्यात पुढच्या तीन दिवस म्हणजे 3 डिसेंबरपर्यंत दाट धुके वाढण्याची शक्यता आहे, पारा 3 ते 5 अंशांनी खाली येईल अशा शक्यता आहे. मात्र 4 डिसेंबरपासून कडाका कमी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पारा घसरला आहे. पुण्यासह मुंबई परिसरात कडाक्याची थंडी वाढल्याचे जाणवत आहे. (Maharashtra Weather Update) 


राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला


राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढल्याचं चित्र आहे. कारण उत्तर भारतातून थंड हवा वेगाने येत आहेत. शनिवारी बंगालच्या उपसागरातून आलेले चक्रीवादळ तामिळनाडू किनारपट्टीवर आल्याने काही भागात अतिवृष्टी सुरू आहे. (Maharashtra Weather Update) 


चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस 




फेंजाल चक्रीवादळ पुढे जात आहे, तसंच त्याचा परिणाम दिसून येत आहे. काल (शनिवारी) दुपारपासून हवामानात बदल झाला आहे. चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळत आहे. आंध्र प्रदेशमध्ये देखील पावसाचा जोर वाढल्याचं चित्र आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे चेन्नई विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.


फेंगल चक्रीवादळामुळे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संध्याकाळीपर्यंत ते पुद्दुचेरी आणि उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. आज किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंजाल चक्रीवादळ हे ताशी 70-80 किलोमीटर वेगाने पुद्दुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपुरम येथे पुढे सरकत आहे. हवामान विभागाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update) 




चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळावरील सर्व उड्डाण बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांवर या वादळाचा परिणाम झाला आहे. काही विमान उड्डाणे वळवण्यात आली असून 18 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. काही सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. NDRF ची टीम ही या घटनास्थळी दाखल आहे. फेंगल चक्रीवादळामुळे नागरिकांना समुद्र किनाऱ्याजवळ न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामुळे पर्यटनस्थळे ही बंद ठेवण्यात आली आहे.