रत्नागिरी : रत्नागिरीतील जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. आज सकाळी जैतापूर अणूऊर्जा प्रकल्प स्थळावर स्थानिकांनी मोर्चा काढून प्रकल्पाविरोधात निदर्शनं केली.

जैतापूर प्रकल्पाजवळील नाटे मोहल्यात हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छिमार बांधव सहभागी झाले होते. या आंदोलनात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता.

या आंदोलनादरम्यान, प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुसरीकडे स्थानिकांच्या या आंदोलनाला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. या अंदोलानत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनीही सहभाग नोंदवला.

शिवसेनेने यापूर्वीही जैतापूर प्रकल्पविरोधी भूमिका घेतली आहे. जैतापूर प्रकल्पासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नसल्याचा इशारा केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि शिवसेना खासदार अनंत गीतेंनी नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला होता. त्याशिवाय शिवसेनेच्या नेत्यांनीही वेळोवेळी या प्रकल्पाविरोधी भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणारच असं ठणकावून सांगितलं होतं. “प्रकल्प खूप पुढे गेला आहे. आता माघार घेता येणार नाही. राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पाला प्राधान्य देणार”, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरात बोलताना केलं होतं.