सोमवार , 9 सप्टेंबर रोजी या दिवशी धुळे बस स्थानकातून सकाळी साधारण साडेआठ वाजता नाशिक बायपाससाठी खाजगी शिवशाही प्रवाशांना घेऊन रवाना झाली. मात्र धुळे शहराजवळ असलेल्या अवधान टोल नाक्याजवळ या गाडीत वातानुकूलित यंत्रणेतील बिघाड, तसेच स्पीडसंदर्भात बिघाड झाल्याने सदरची बस खोळंबली. ही गाडी ठेकेदाराची असल्यानं दुसऱ्या गाडीची व्यवस्था करण्याची जबाबदारी ठेकेदाराची होती. त्यानुसार दुसरी खाजगी शिवशाही रवाना करण्यात आली. मात्र या दुसऱ्या बसमध्येही बॅटरीच्या खराबीमुळे बस बंद पडल्यानं प्रवाशी संतप्त झाले.
यानंतर संतप्त झालेल्या प्रवाशांनी टोल नाक्याजवळ नाशिककडे जाणाऱ्या काही बसेस रोखून धरल्या. प्रवाशांनी एसटीच्या मालकीच्या शिवशाही बसचीच मागणी केल्यानं अखेरीस एसटी महामंडळाच्या मालकीची शिवशाही रवाना करण्यात आली. शिवशाहीचा मनस्ताप झालेल्या प्रवाशांनी परिवहन मंत्र्यांचा उद्धार करीत खाजगी शिवशाहीचा निषेध केला. एरवी एसटीच्या मालकीच्या बसेसमध्ये तांत्रिक बिघाड होतात, मात्र त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाल्याचं तरी ऐकिवात नाही.
धुळे बायपास नाशिक या मार्गावर एसटीच्या साध्या बसचं भाडं 205 रुपये आहे तर शिवशाहीचं भाडं 310 रुपये आहे. म्हणजे 105 रुपये भाडं ज्यादा देऊन आरामदायी , वातानुकूलित प्रवास व्हावा यासाठी शिवशाहीने प्रवास करतात मात्र प्रवाशांना ज्यादा पैसे मोजून सुद्धा मनस्ताप देणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई करणार? असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तीन तासात होणारा हा प्रवास खाजगी शिवशाहीच्या बिघाडामुळे पाच तासावर गेल्यानं ज्यादा पैसे देऊन मनस्ताप विकत घेतला असाच काहीसा अनुभव प्रवाशांना आला. तब्बल अडीच तास प्रवाशांना धुळे शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ताटकळत थांबावे लागले.