सांगली : कोरोना स्थितीत राज्यातील खाजगी डॉक्टरांना सुद्धा आता विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. तसेच राज्यात आरोग्य विभागात 17 हजार जागा भरल्या जातील अशी घोषणाही करत मास्क आणि सॅनिटायझर याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये करण्यात येणार असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते.


सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने 10 कोटी रुपये खर्चून हे अद्यावत हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. या अद्यावत हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते यावेळी हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या रुग्णालयात 40 बेडचे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले असून, यामध्ये 10 बेडचे अतिदक्षता विभाग, 20 बेडचा जनरल वॉर्ड आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसह विविध अद्यावत आणि खास सोई-सुविधा या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.


या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यात कोरोना स्थितीमध्ये अनेक खासगी डॉक्‍टरांच्याकडून सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने आयएमए यांच्यासोबत चर्चा करून राज्यातल्या सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना काळात विमा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा यावेळी केली आहे. त्यामुळे जर एखादा डॉक्टर आरोग्य सेवा बाजवताना कोरोना बाधित होऊन मृत्यू झाल्यास त्या डॉक्टरांना 50 लाख रुपये विमा मिळणार आहे. त्यामुळे डॉक्टर्सनी आता त्यांच्या सुरक्षेची काळजी करण्याचं कोणतेच कारण नाही. शिवाय राज्य शासन प्रत्येक डॉक्टर सोबत आहे. त्याच बरोबर कोरोना काळात जर एखादी हिंसक घटना डॉक्टरांसोबत घडल्यास नव्या कलमानुसार कारवाई करण्याच्या सूचना गृह खात्यामार्फत देण्यात आल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


तसेच मास्क आणि सॅनिटायझर हे जीवनावश्यक वस्तूमध्ये समावेश करण्याच्या निर्णयही घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं, आणि मास्क व सॅनिटायझर हे आता यापुढे गरजेचे असल्याने त्याचे दरही नियंत्रित आणले जाणार असून, येत्या चार दिवसात याबाबत निर्णय होणार असल्याचेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता राज्यातल्या आरोग्य विभागातील 17 हजार जागा भरण्यात येणार असून मेरीटद्वारे या जागा भरण्यात येतील, असंही राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.