Prakash Ambedkar : इराणसारखा देश ट्रम्प यांना भीक घालत नाही, नरेंद्र मोदी हे भित्रे भागूबाई अन् कणा नसलेलं नेतृत्व : प्रकाश आंबेडकर
Prakash Ambedkar : भारत आणि पाकिस्तानने किती दिवस युद्ध लढायचे याचे नियंत्रण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे होतं. नरेंद्र मोदींकडे ट्रम्पचा दावा खोडून काढण्याची धमक नाही अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मुंबई : पाकिस्तानविरोधातल्या युद्धाचे सर्वाधिकार एकदा का लष्कराला दिल्यानंतर त्यामध्ये पंतप्रधानांनी घुसण्याची गरज काय? भारतीय लष्कराला 1971 च्या युद्धाची पुनरावृत्ती करण्याची संधी असताना मोदींनी ती गमावली अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. इराणसारखा देश डोनाल्ड ट्रम्प यांना भीक घालत नाही, पण मोदींनी तशी भूमिका घेतली नाही. नरेंद्र मोदी हे कणा नसलेले नेतृत्व असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये लुटुपुटूची लढाई झाली असे मी मानतो. लष्कराचे म्हणणे वेगळे होते, एकदाच आम्ही पाकिस्तानला संपवू अशी त्यांची भूमिका होती. मात्र सध्याचं राजकीय नेतृत्व हे कमकुवत कणा नसेलेलं आहे. इराणसारखा देश अमेरिकेला भीक घालत नाही. पण नरेंद्र मोदी यांनी तशी भूमिका घेतली नाही."
Prakash Ambedkar On Narendra Modi : पंतप्रधान हे भित्रे भागूबाई
अमेरिकेच्या दबवानंतर नरेंद्र मोदींनी युद्धबंदी जाहीर केली, आपला पंतप्रधान हे भित्रे भागूबाई आहेत हे सिद्ध झालं अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते म्हणाले की, "एकदा लष्कराला अधिकार दिल्यानंतर त्यामध्ये पंतप्रधानांनी घुसायची काय गरज आहे? दोन दिवसात हवाई दलाने या युद्धावर नियंत्रण मिळवलं होतं. पाकिस्तान सात दिवसापेक्षा जास्त लढू शकत नव्हता. त्यामुळे 1971 च्या युद्धाची पुनरावृत्ती करण्याची संधी होती. पण या सरकारने ही संधी गमावली. त्यामागे काय कारण आहे हे भाजपने स्पष्ट करावं."
Prakash Ambedkar On India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान युद्धाचे नियंत्रण ट्रम्प यांच्याकडे
भारत आणि पाकिस्तान युद्धाचे नियंत्रण हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले, ते म्हणाले की, "पहलगाम बाबत जी लढाई झाली त्याचे नियंत्रण हे ट्रम्प यांच्याकडे होतं. भारत-पाकिस्तानने किती दिवस लढायचं, कधी थांबायचं हे ट्रम्प यांनी ठरवलं. ट्रम्प यांनी केलेला दावा खोडून काढण्याची धमकही नरेंद्र मोदी यांच्याकडे नाही."
Prakash Ambedkar On Agniveer : अग्निविरांनाही समान दर्जा द्या
प्रकाश आंबेडकर म्हमाले की, "मुंबईमधील घाटकोपर रमाबाई नगर येथे राहणारे मुरली नाईक यांना पाकिस्तानविरोधातल्या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली. यामध्ये शहीद झालेत त्यांना जो दर्जा मिळतो किंवा लाभ मिळतात ते अग्निविरांना मिळत नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयातही या संबंधी याचिका दाखल करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने अग्निविरांना वीरगती प्राप्त झाली तर मदत करण्याचं जाहीर केलं होतं. पण दुर्दैवाने केंद्रशासन आणि महाराष्ट्र सरकार कोणत्याही प्रकारची मदत द्यायला तयार नाही. यासंबंधी मी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागितली आहे. या संदर्भात केद्र आणि राज्याने न्याय दिला नाही तर कोर्टाचे दरवाजे ठोठावणार."
एखाद्या सैन्याला वीरगती प्राप्त झाली तर शासनाकडून एक कोटी दिले जातात. पण मुंबईमधील मुरली नाईक यांना मात्र तशी मदत मिळाली नाही. शासनाने मुरली नाईक यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे. कुणीही शहीद झाले, मग त्यामध्ये अग्निवीर जरी असले तरी, त्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर म्हणाले.























