सांगली : केंद्राचे कायदे न पाळणे ही देशाशी बगावत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. तसेच माझ्या दृष्टीने काँग्रेस संपलेली आहे, आजही काँग्रेसचे नेते निवडणूक काळात हॉलिडेच्या मूडमध्ये आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सांगली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे .
काँग्रेसचे नेते निवडणूक काळात देखील हॉलिडेच्या मूडमध्ये
काँग्रेस सोबत जाण्याबाबत आपण अनुकूल होतो, मात्र काँग्रेसने जागावाटपाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही. मात्र जर कॉंग्रेसकडून पुन्हा हात पुढे आल्यास विचारू करू,पण माझ्या दृष्टीने काँग्रेस आता संपली आहे. आजही काँग्रेसचे नेते निवडणूक काळात देखील हॉलिडेच्या मूडमध्ये आहेत, अशा पक्षाचं मग कल्याणच आहे.
तर केंद्र सरकार कधीही 356कलम लावू शकते
राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राचे आदेश पाळण्यात येत नसल्याच्या प्रश्नावरून बोलताना आंबेडकर म्हणाले, केंद्राचे जे कायदे किंवा आदेश असतील ते राज्य सरकारला पाळणे संविधानानुसार गरजेचे आहे. पण राज्य सरकार जर आदेश धुडकावून लावत असतील तर हा विद्रोह आहे. जर राज्य सरकार बगावत करत असेल तर केंद्र सरकार घटनेतील तरतुदीनुसार केंद्र 356 कलम लावू शकते.
पदवीधर आणि शिक्षक निवडणूका आतापर्यंत विना अजेंडा लढवल्या जात होत्या. विरोधी पक्षातील उमेदवाराचा पदवीधरांशी आणि शिक्षकाशी आतापर्यंत कसलाही संबंध आला नाही. आताही सगळे उमेदवार कारखानादार आहेत. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल व्हावा यासाठी आम्ही या निवडणूका लढवत आहोत. आरक्षित वर्गातील मतदार आमच्यासोबत राहील ही अपेक्षा आहे असे आंबडेकर म्हणाले.
राज्यात व्यवसायिक शिक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या आरक्षणात सर्वच सरकारने बदल केले आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास आरक्षण समूहात असलेल्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना हक्काच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत आहे,असा आरोप आंबडेकर यांनी केला. 70 वर्षांमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्याला कारण सरकारचा नाकर्तेपणा आहे.
राज्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र उच्च न्यायालयामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. मुस्लिम समाजाला मात्र मिळाली नाही, पण धर्मनिरपेक्षचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केले नाही,असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.
विधानसभा मध्ये जर आम्ही गेलो तर मुस्लिम, मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लावू असे म्हणत मराठा आरक्षणाच्या विरोधात श्रीमंत मराठाच उभा आहे. जो श्रीमंत मराठा आहे त्या वर्गालाच गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असे वाटेत, असेही आंबेडकर म्हणाले.