Prakash Ambedkar on Ram Mandir : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या राम मंदिर सोहळ्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही श्री रामजन्मभूमी ट्रस्टकडून निमंत्रण मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण आल्यानंतर ट्रस्टच्या निमंत्रणावर आभार व्यक्त करताना सोहळ्यास उपस्थित राहण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. त्यांनी सोहळ्याला उपस्थित न राहण्याचे कारण सुद्धा सांगितले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रण आल्यानंतर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र पाठवत नाराजी व्यक्त केली आहे. जप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं आहे?
अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराच्या अभिषेकासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. मी उपस्थित न राहण्याचे कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे. धार्मिक सोहळा हा निवडणुकीच्या फायद्यासाठी राजकीय प्रचार बनला आहे. ते पुढे म्हणतात, माझे आजोबा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी इशारा दिला होता की "राजकीय पक्षांनी धर्म, पंथ यांना देशाच्या वर ठेवला तर आमचे स्वातंत्र्य दुसर्यांदा धोक्यात येईल आणि या वेळी कदाचित आम्ही ते कायमचे गमावू." आज ही भीती खरी ठरली आहे. धर्म आणि पंथाला देशापेक्षा वरचे स्थान देणाऱ्या भाजप-आरएसएसने आपल्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे.
शरद पवारांचं श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र
दुसरीकडे, शरद पवार यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलं आहे. सोहळ्याचं निमंत्रण दिल्याबद्दल शरद पवार यांनी श्रीरामजन्मभूमीच्या सरचिटणीस चंपत राय यांचे आभार मानताना 22 जानेवारीनंतर रामलल्लाचं दर्शन घेणार असल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल, असा उल्लेख पत्रात केला आहे. निमंत्रण आल्यानंतर शरद पवार म्हणाले की, अयोध्येला मी नक्की जाणार, पण 22 जानेवारीनंतर जाणार आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी रामभक्त येथील. त्यामुळे 22 जानेवारीनंतर रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या