Prakash Ambedkar Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातल्या राजकीय उलथापालथीवर प्रकाश आंबेडकरांनी सूचक ट्वीट केलं होतं. त्यानंतर एबीपी माझानं त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सत्तानाट्यावर भाष्य करत महत्वाच्या बाबींवर मत व्यक्त केलं. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, या प्रक्रियेत विधानसभेच्या उपाध्यक्षांची भूमिका महत्वाची आहे. उपाध्यक्षांना कायद्याने इतके जास्त अधिकार आहेत की नाही ते पाहावं लागेल. एकनाथ शिंदेंकडून सादर करण्यात येणाऱ्या पत्रावर ज्या आमदारांच्या सह्या आहेत त्या प्रत्येक आमदाराला प्रत्यक्ष बोलावून त्यांनी खरंच सही केलीय का? आणि केली असेल तर कोणत्या मानसिक अवस्थेत केलीय हे उपाध्यक्ष विचारु शकतात.
आंबेडकर यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेनी जरी राज्यपालांकडे आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र दिले तरी राज्यपाल फ्लोअर टेस्ट शिवाय सरकार बरखास्त करु शकणार नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा फ्लोअर टेस्ट व्हावी ही असणार. या आधी इतर राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी न्यायालयानेही फ्लोअर टेस्टचे आदेश दिले आहेत, असं ते म्हणाले.
त्यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त आमदार सध्या दिसत असले तरी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना त्यांच्या गट भाजपमध्ये विलिन करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांचं शिवसेना म्हणून स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. एकनाथ शिंदे याला तयार होतील का? असंही आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर यांनी म्हटलं की, भारतीय जनता पक्षाकडून अजून पत्ते खुले करण्यात आलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यात आली आहे. आज जे भाजपविरोधी ते हिंदू विरोधी हे भाजपने सेट केलेले नॅरेटिव्ह विरोधी पक्षांना ब्रेक करता येत नाही. तेवढं धाडस त्यांच्यात नाही. महाराष्ट्रातील सत्ता नाट्यात अजून बरेच काही होणे बाकी आहे, असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा
सरकार स्थापन करण्यासाठी भाजपमध्ये विलिनीकरण होण्याची अट शिंदे गटासमोर ठेवलीय का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. प्रकाश आंबेडकर यांच्या या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा होऊ लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे? असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.