मुंबई: भाजपसोबत वंचित कधी गेला नाही आणि जाणारही नाही. पक्षाची भूमिका बदलेली नाही, असे म्हणत  प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) आपली भूमिका मांडली आहे.  एकनाथ शिंदेंनी भाजप सोबतची साथ सोडली तर शिंदेंसोबत जाऊ असे म्हणत शिंदे आणि आंबेडकर युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार 


प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री बंद दाराआड अडीच तास बैठक झाली आहे. बैठकीनंतर शिंदे आणि आंबेडकर चर्चांना राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, काल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत अनेक चर्चा झाल्या. आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना माहिती आहे.  भाजप ज्यांच्याबरोबर आहे त्यांच्याबरोबर आम्ही कधीही गेलो नाही. आरएसएस आणि भाजपविरोधातलं भांडण व्यवस्थेविरोधातलं आहे. भाजप आणि मित्रपक्षांबरोबर कोणताही समझोता नाही. जर शिंदेंनी भाजपची साथ सोडली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. 


चार भींतीमध्ये झालेली युती कधी जाहीर करायची हे उद्धव ठाकरेंनी ठरवायचं


उद्धव ठाकरेंना फायनल करायचं असेल ते त्यांना ठरवायचं आहे. आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत हे आम्ही उघडपणे सांगत आहे. आमची युती झाली पण पब्लिक कमिटमेंट नाही झाली. चार भिंतीमध्ये युती  कधी  जाहीर करायची हे आता उद्धव ठाकरेंनी ठरवायचं आहे. कॉंग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला आहे. कॉंग्रेस आणि शरद पवारांना ओळखणारा नेता माझ्यासारखा दुसरा नेता नाही.  शिवसेनेला कॉंग्रेस फसवेल त्यामुळे त्यांनी अधिक वेळ थांबू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


शिवसेना आणि वंचितमध्ये कुठेही मतभेद नाही


 शिवसेना आणि वंचितची आघाडी होणार  आहे. शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आहे असे वाटते. त्यामुळे निवडणुकीपर्यंत ते प्रयत्न करतील. एकनाथ शिंदे सुद्धा जुने शिवसैनिक आहे. पॅन्थर आणि शिवसेनेचे संबंध त्यांना अधिक चांगले  माहिती आहे. शिवसेनेचे प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनं सोबत यावं मात्र ते येणार नाही तरीही सेनेनं प्रयत्न करावे.  जागा वाटपात शिवसेना आणि वंचितमध्ये कुठेही मतभेद नाही. 2024 साली ज्या पक्षानं सोडलंय आणि 2029 ची वाट बघत आहे.  त्यांच्या पाठीमागे पळण्यात काही अर्थ नाही मुंबई पालिकेसाठी 88 जागांवर आमची तयारी आहे.