Prakash Ambedkar : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या (Shivsena) संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय घेतला आहे. त्यांचा निर्णय योग्यच असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे आंबेडकर म्हणाले.


नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 


केंद्रीय निवडणूक आयोगानं काल (17 फेब्रुवारी) शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणं हे निवडणूक आयोगाचं काम नसल्याचे आंबेडकर म्हणाले. 


धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदेंना


शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. 


2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत असे आयोगाने म्हटलं आहे.    


निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार : उद्धव ठाकरे


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या 21 फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात नियमीत सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी मागणी आम्ही उद्धव ठाकरेंनी केली होती. तरी देखील निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार : उद्धव ठाकरे