नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar in Nagpur)  यांनी आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध कुणापासून लपलेले नाहीत. संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक मुस्लिम आरक्षणाबद्दल मुस्लिमांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आता मुस्लिमांनीच ठरवावे की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मालिकांच्या मागे उभे राहावे की नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.


OBC आरक्षणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले आहे. मात्र, जर राज्य सरकारने इम्पेरिकल डेटा गोळा करून सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली ओबीसी समाजबद्दलची माहिती व आकडे दिले नाहीत तर येत्या काही वर्षांत ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरीविषयक आरक्षणही नाहीसे होण्याची भीती असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.


सध्या महाराष्ट्र विधानसभेचे सत्र सुरू असून महाराष्ट्र सरकारने विधानसभेत कायदा करून जनगणना आयोगाकडे संपर्क साधावा आणि त्यांच्या मार्फत ओबीसींची आवश्यक गणना करून घेत सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती द्यावी. राज्य सरकारने तसे केले नाही तर ओबीसींचे शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षणही भविष्यात नाहीसे होईल असे आंबेडकर म्हणाले. 


दरम्यान, राज्य सरकार राज्याच्या मागास वर्ग आयोगाच्या मार्फत इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे अट्टाहास करत आहे. मात्र, राज्य मागास वर्ग आयोगाला खरोखरच स्वतःहून ओबीसींची गणना करण्याचे अधिकार आहेत का. आयोगाची निर्मिती करताना राज्य सरकारने आयोगाच्या अटीशर्तींमध्ये तशी तरतूद केली आहे का याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. राज्य सरकारने याबाबत लक्ष नाही घातले तर भविष्यात मराठा आरक्षणाच्या बाबतीत जसे झाले तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल होईल अशी शंका आंबेडकर यांनी बोलून दाखविली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha